मुंबई - देशासह राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहेत. यामध्ये मुंबई परिसर आणि पुण्यात जास्त रुग्ण संख्या आहे. मुंबईतील कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील बिल्डरांची संघटना असलेली एमसीएचआय-क्रेडायनेही सामाजिक भान राखत कोरोनाच्या लढ्यात आपला खारिचा वाटा उचलला आहे. आज त्यांच्या पुढाकाराने मोबाईल मेडिकल व्हॅन अर्थात मोबाईल दवाखाना सुरू केला आहे. या मोबाईल दवाखान्यामुळे आता रूग्णांना दवाखान्यापर्यंत जावे लागणार नाही तर दवाखाना त्यांच्या दारी येणार आहे.
भारतीय जैन संघटना, देश अपनाए आणि क्रेडाई-एमसीएचआय यांनी एकत्र येत ही संकल्पना आणली. तर मुंबई महानगर पालिकेच्या मदतीने ती प्रत्यक्षात साकारली. आज सकाळी ११ वाजता एनएससीआय वरळी येथे मोबाइल दवाखाना सेवा व्हॅन सुरू करण्यात आल्या. याचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता डॉक्टर थेट रुग्णांच्या दरात जाऊन तपासणी करणार असल्याने ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
ही व्हॅन आता दारोदारी जाणार असल्याने ताप-सर्दी-खोकला अशी लक्षणे असणाऱ्यांनी या मोबाईल व्हॅनमध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. कोरोनापासून स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला दूर ठेवावे असे आवाहन यावेळी पेडणेकर यांनी केले आहे. तर आता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या या मोबाइल मेडिकल व्हॅन असल्या तरी येत्या काळात त्यांची संख्या वाढवत ती 100 पर्यंत नेण्यात येणार असल्याचे एमसीएचआय-क्रेडायने सांगितले.