मुंबई : मशिदींवरील भोंग्यांवरून चर्चेत आलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भात पुढे सरसावली ( MNS Aggressive For Employment For Locals ) आहे. हॉटेल रेस्टॉरंटची मोठी चैन असलेला उद्योग समूह बार्बेक्यू नेशनमध्ये महाराष्ट्रात मराठी तरुणांना फार कमी रोजगार असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. यावरून त्यांनी कामगार कायद्या अंतर्गत बार्बेक्यू नेशनला पत्र लिहिले व त्यांच्या सर्व शाखांमध्ये मराठी तरुणांना जास्तीत जास्त रोजगार देण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले ( MNS Warning Barbecue Nation ) होते. यावर आता बार्बेक्यू नेशनने मनसेला पत्र लिहून मराठी तरुणांना रोजगार देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
लक्षात ठेवा गाठ मनसेशी : यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र निर्माण कामगार सेनेचे चिटणीस शांताराम राणे म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी आम्ही बार्बीक्यू नेशन संदर्भात एक आंदोलन हाती घेतलं होतं. यात बार्बेक्यू नेशनमध्ये जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा हा त्यामागचा उद्देश होता. तसं पत्र आम्ही या संस्थेला दिलं होतं. या पत्रात आम्ही भूमिपुत्रांना रोजगार द्यावा असा स्पष्ट उल्लेख केला होता. या पत्रकात आम्ही त्यांना आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्या मागणीला आता बार्बीक्यू नेशनने पत्र लिहून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात कुठेही भूमिपुत्रांवर अन्याय झाला तर लक्षात ठेवा गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे.' अशी प्रतिक्रिया शांताराम राणे यांनी दिली आहे.
काय म्हटले बार्बेक्यू नेशनने पत्रात : बार्बेक्यू नेशन या संस्थेकडून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला देण्यात आलेल्या पत्रात त्यांनी म्हटले ( Barbecue Nation Wrote MNS ) आहे की, 'आम्ही बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेड, एक प्रतिष्ठित आणि जबाबदार संस्था म्हणून ज्या राज्ये/प्रदेशांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. तिथे स्थानिक/ निवासी उमेदवारांसाठी समान रोजगार संधी निर्माण करण्यावर नेहमीच विश्वास ठेवतो. त्या अनुषंगाने, आमच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना, प्रथम प्राधान्य नेहमी स्थानिक/निवासी उमेदवारांना दिले जाते. तथापि, अंतिम निवड उमेदवारांची गुणवत्ता, उपलब्धता आणि पात्रता यावर आधारित आहे. आम्ही आपणाकडून मांडलेल्या मुद्द्याचे स्वागत करतो. आणि स्थानिक/निवासी उमेदवारांना प्राधान्य देऊन आवश्यक गुणवत्ता आणि पात्रता मानकांवर पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना समान रोजगार संधी देत होतो व देत राहू. तसेच महाराष्ट्रात असलेल्या आमच्या अनेक शाखांमध्ये, आम्ही त्याच परिसर/प्रदेशातील स्थानिक/निवासी उमेदवारांना नियुक्त केले आहे व करत राहू. त्या करीता यापुढे नियुक्ती प्रक्रियेत आम्हाला आपणाकडूनही सहकार्य मिळेल ही विनंती.'