मुंबई - मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मनसेच्या नविन झेंड्याचे अनावरण राज ठाकरेंच्या हस्ते झाले. झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरण्यात आली आहे. यामुळे आता हा मुद्दा वादग्रस्त होण्याच्या मार्गावर असून झेंड्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने भूमिका घेतली असून मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील खटला दाखल करणार आहेत.
मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर शिवरायांची 'राजमुद्रा' वापरण्यात आली आहे. या झेंड्यावर समाज माध्यमांतून काय प्रतिक्रिया येतात ते आता पाहावे लागेल. याअगोदर मात्र मराठा क्रांती मोर्चाने या झेंड्याबाबत आक्षेप नोंदवला होता. तरीही मनेसेने आपल्या नव्या झेंड्यावर राजमुद्राच ठेवली आहे. त्यामुळे मनसे आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मनसेने राजमुद्रेचा वापर टाळावा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा उच्च न्यालायत जाणार असून, या प्रकरणी खटला दाखल करणार असल्याचे मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक केदार सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.