मुंबई - मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आज वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी पक्षाच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा होणार आहे.
या मेळाव्यास राज्यभरातून हजारो मनसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये 34 ते 40 जणांचा समावेश असणार आहे. मनसेची ही शॅडो कॅबिनेट सरकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवणार आहे.
हेही वाचा - कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच; सरकारची कबुली
नवी मुंबईत महापालिका निवडणूक तोंडावर असताना मनसेचा वर्धापन दिन मेळावा वाशीत होत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून विरोधकांवर तोफ डागली जाण्याची शक्यता आहे. तर वर्धापन दिनाच्या मेळाव्यात ठाकरे यांच्याकडून नवी मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याची घोषणाही होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - "मिलिंद एकबोटेंना वढू गावात जाण्यास बंदी घालावी"