मुंबई - गणोशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मनसेकडून शनिवार (दि. 8 ऑगस्ट) दादर येथून पहिली बस रवाना झाली.
गेले कित्येक दिवस कोकणात गणोशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नव्हते. परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सरकारने विशेष रेल्वे व बसेस सोडल्या. मात्र, मुंबईतून कोकणात गणोशोत्सवाला जाण्यासाठी निर्णय होत नव्हता. यावरुन मनसेने सरकारवर टीका देखील केली होती. अखेर 1 ऑगस्टपासून मनसेकडून कोकणात जाण्यासाठी नोंदणी करण्यात आली. आज कोकणासाठी पहिली बस दादर येथून रवाना झाली.
यावेळी बसमध्ये प्रवेश देण्यापूर्वी प्रवाशांचे शरीराचे तापमान तपासण्यात आले. तर मनसेकडून ग्लोव्हज, सॅनिटायझर, बेडशीटचे वाटप करण्यात आले.
शनिवारी ( 8 ऑगस्ट) मनसेकडून मुंबईच्या दादर, बोरिवली, वसई विरार येथून 10 ते 15 बसेस कोकणासाठी रवाना करण्यात आल्या. यावेळी मनसेचे नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, महिला विभागाच्या अध्यक्ष रिटा गुप्ता, मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात गणोशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी या बस मनसेकडून सोडण्यात आल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.