मुंबई : MNS Loksabha Election २०२४ : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. सर्वच पक्ष त्या दृष्टीनं तयारी करत असून, आढावा बैठका सुरू आहेत. तर काही पक्ष आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांना कशी टक्कर देता येईल यासाठी आराखडा तयार करत आहेत. मात्र, सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray Loksabha २०२४) याकडं एक संधी म्हणून बघत आहे.
राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसोबत चर्चा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पूर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी काही निरीक्षक देखील नेमण्यात आले होते. या निरीक्षकांनी जो अहवाल दिला, त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
पुणे, मावळवर असणार लक्ष : मनसेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ आणि पुणे या दोन लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आहेत. बारणे यावर्षी देखील याच मतदासंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी, भाजपा असे इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. अशातच पुण्यात दिवसेंदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद देखील वाढत आहे. त्यामुळं या दोन भागात आपला लोकसभेचा उमेदवार देण्यासाठी राज ठाकरे तयारी करत असल्याची माहिती आहे.
ही काही विशेष बैठक नव्हती. निवडणुका तोंडावर आहेत. त्यादृष्टीनं राज ठाकरे बैठका घेत असतात. तशीच एक रुटीन बैठक आज झाली. या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला. सोबतच या बैठकीत कोकणचा रस्ता असो, परप्रांतीयांनी मराठी माणसाचं घरं खाली करणं असो किंवा मराठी माणसाला घर नाकारणं असो, जिथे जिथे जनतेला प्रश्न निर्माण होतात, तिथे राज ठाकरे खंबीरपणे पुढे असतात - अभिजीत पानसे, मनसे नेते
जनतेच्या मदतीला मनसे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आजपर्यंत अनेक कामं केली आहेत. टोलनाका आंदोलनही मनसेनं सुरू केलं होतं. मराठी माणसावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा मनसे त्यांच्या मदतीला धावून जाते. गणपतीची सुट्टी वाढवून मिळण्यासाठीही मनसेनंच आवाज उठवला होता. मराठी पाट्यांचा विषयही राज ठाकरे यांनीच मांडला होता. या विषयात आम्हाला यश आलं. मात्र, या महाराष्ट्रात मराठी माणूस हरवून गेला आहे, असं अभिजीत पानसे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Refused House To Marathi : घर नाकारणाऱ्या पिता पुत्राला भिडली 'मराठी वाघिण'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंनी केला सत्कार
- Raj Thackeray : '...तर गालावर वळ उठतील', मराठी महिलेला मुंबईत ऑफिससाठी जागा नाकारल्यानंतर राज ठाकरे आक्रमक
- MNS Warning Toll Administration : टोल नाक्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक; ...तर आमच्याशी गाठ, टोल प्रशासनाला इशारा