मुंबई - जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात काही दिवसांपासून वाद पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनने आपल्या संकेतस्थळ, अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मनसेची मागणी आहे. मात्र, याविरोधात अॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे मनसे आक्रमक झाली असून थेट अॅमेझॉनच्या मुंबई कार्यालयाबाहेर पोस्टर लावत अॅमेझॉनला इशारा देत, 'नो मराठी, नो अॅमेझॉन' अशी मोहीम सुरू केली आहे.
महाराष्ट्रात मराठी माणसांनी अॅमेझॉन का वापरावं?
ॲमेझॉन कंपनीच्या संकेतस्थळ, ॲपमध्ये मराठी भाषा सामावून घ्यावी, यासाठी मनसे गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत आहे. मनसेने आक्रमक भूमिका घेत त्यांना इशारा देखील दिला. यानंतर अमेझॉनचे शिष्टमंडळ आणि मनसे नेते यांची एक बैठक झाली. मात्र, त्यात काही तोडगा निघाला नाही. ॲमेझॉनने आता न्यायालयात धाव घेतली असून मराठी भाषेचा वापर करू शकत नाही, असे म्हणणे मांडले आहे. त्यामुळे मग महाराष्ट्रात मराठी माणसांनी अॅमेझॉन का वापरावे? असा प्रश्न मनसे नेत्यांनी कंपनीला केला आहे.
मनसे नेते अखिल चित्रे यांनी राबवलीय मोहीम
ॲमेझॉन कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर मराठी सामावून घ्यावी, यासाठी मनसे नेते अखिल चित्रे यांनी सुरुवातीपासून धडपड सुरू केली आहे. पण, आता थेट कंपनीने नाही म्हटल्यावर 'नो मराठी, नो ॲमेझॉन' अशी मोहीम चित्रे यांनी राबवली आहे. याचे पोस्टर थेट मुंबईतील बीकेसी येथील ॲमेझॉनच्या कंपनी बाहेर लावत कंपनीला तुम्हाला आमची भाषा नको तर आम्हालाही तुम्ही नको, असा इशारा यातून दिला आहे. मनसेने शिवसेना मंत्री सुभाष देसाईंना देखील पत्र लिहीत, अमेझॅान ॲपमध्ये मराठी भाषा नसल्याची तक्रार केली आहे. मंत्र्यांनी वेळीच दखल घेत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.