मुंबई - गोरेगाव येथील मोतीलाल नगरचा पुनर्विकास म्हाडा करणार आहे. परंतु, याला काही स्थानिकांनी विरोध केला आहे. स्थानिकांचे म्हणणे म्हाडापर्यंत पोहोचावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे म्हाडा कार्यालयात शालिनी ठाकरे यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन दिले.
मुंबई उपनगरातील गोरेगाव (पश्चिम) विभागातील मोतीलाल नगर क्र. १,२ व ३ वसाहतींचा पुनर्विकास करणारी योजना म्हाडातर्फे राबवण्यात येणार आहे. म्हाडातर्फे सदर वसाहतींचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया सप्टेंबर २०१९ या महिन्यात आणि प्रकल्पाची पायाभरणी ऑक्टोबर २०१९ या महिन्यात करण्यात येणार आहे. परंतु, गोरेगाव येथील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे येथील रहिवाशी भीतीच्या छायेत आहेत. या रहिवाशांची मागणी मांडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन रहिवाशांची व्यथा मांडली.
गोरेगांव (पश्चिम) विभागातील बहुतांश विभाग सध्या पुनर्विकासाच्या जाळ्यात अडकलेला आहे. निरलॉन वसाहत, एम. आय. जी वसाहत, सिद्धार्थ नगर, ज्ञानेश्वर नगर या वसाहतींचा पुनर्विकास गेली १५ वर्षे रखडून पडलेला आहे. अशा परिस्थितीत हा पुनर्विकास रखडला तर आपण रस्त्यावर या भीतीमुळे मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला सामोरे जाण्याची मानसिकता सध्यातरी मोतिलाल नगर मधील रहिवाशांमध्ये नाही आहे.
बेघर झालेल्या कुटुंबांची अवस्था, त्यांना वेळेवर न मिळणारे भाडे, म्हाडाकडून नेमण्यात आलेल्या खासगी विकासकांकडून या कुटुंबांची होणारी फसवणूक या गोष्टी मोतीलाल नगरमधील रहिवाशांना माहीत आहे. त्यामुळे म्हाडा असो वा खाजगी विकासक, जोपर्यंत या कुटुंबाना त्यांची घरे आणि थकीत भाडे मिळत नाहीत, तोपर्यंत मोतीलाल नगरमधील रहिवाशी पुनर्विकास प्रकल्पाला तयार होणार नाहीत. त्यात म्हाडाने मोतीलालनगरमधील रहिवाशांना विचारात न घेता जर या पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा तयार केला असेल तर मात्र मोतीलाल नगर मधील रहीवाशी अशा प्रकारच्या मनमानी कारभाराचा एकजुटीने कडाडून विरोध करतील, असे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.
काय आहेत मागण्या ?
१) मोतीलाल नगरच्या आजूबाजूला असलेले सर्व पुनर्विकास प्रकल्प मग ते म्हाडाचे असो वा खासगी, लवकरात लवकर पूर्ण करावे.
२) मोतीलाल नगरमधील वसाहती या ५० पेक्षा जास्त वर्षे जुन्या आहेत. त्यामध्ये समारे ३ हजार ७०० कुटुंबाचे वास्तव्य आहे. त्यामुळे पुनर्विकास बाबत त्यांच्या मागण्या काय आहेत? हे जाणुन घेऊनच या पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा तयार करावा.
३) एकाच घरात राहणाऱ्या कुटुंबाची संख्या, मोतीलाल नगर क्र.१, २ व ३ चा एकूण भूखंड आणि त्यावर मिळणारा ४ चा एफ.एस.आय या गोष्टी लक्षात घेता प्रत्येक घरामागे सुमारे ३००० चौ.फुट. चटई एरिया मिळाला पाहिजे.
४) नवीन इमारतीमध्ये घर मिळाल्यानंतर त्या रहीवाशांना येणारा दरमाही देखभालीचा खर्च म्हाडातर्फे देण्यात येणाऱ्या कॉर्पस फंडातून मिळणाऱ्या व्याजातूनच भागला पाहिजे.
५) संपूर्ण पुनर्विकास प्रकल्पामध्ये खेळण्यासाठी मैदाने, आबाल वृध्दांसाठी बागबगिचे, उत्तम अंतर्गत रस्ते, मुबलक पाणी, उत्तम सांडपाणी व्यवस्था, २४ तास उपलब्ध आरोग्य व्यवस्था, औषधाचे दुकान व ए.टि.एम सेंटर, उत्तम सुरक्षा व्यवस्था, अत्याधुनिक व्यायामशाळा व वाचनालय, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी दोन-तीन सभागृहे, उत्तम वसतिगृह, पाळणाघर, धार्मिक स्थळे, चित्रपट व नाटयगृह, जलतरण तलाव, क्रीडा भवन इत्यादी सोयींची तरतूद करणे आवश्यक आहे.
६) मूळ रहीवाशी सध्या जिथे रहात आहे त्याच ठिकाणी त्यांचे पुनवर्सन होणे अत्यंत महत्वाचे आहे.
७) संपूर्ण प्रकल्पासाठी लागणारी यंत्रणा व आवश्यक परवानग्या प्रकल्पाच्या अंमलबजाणी अगोदरच पूर्ण तयार असाव्यात.
८) संपूर्ण प्रकल्पासाठी उत्कृष्ठ दर्जाचे बांधकाम ठेकेदार नेमण्यात यावे.