मुंबई - वाढीव वीज बिलाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना जाब विचारून वाढीव वीज बिलाबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आज (बुधुवार) वाढीव वीज बिलाबाबत जनतेत असलेला आक्रोश दर्शवण्यासाठी बोरिवलीच्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर मनसेने धडक दिली.
अदानी इलेक्ट्रिसिटीने आकारलेल्या अवाजवी बिलांबद्दल मनसे सरचिटणीस नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने अदानीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मनसेच्यावतीने निवेदन दिले. यावेळी बांद्रा ते भायंदरमधील मनसे विभागअध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. वाढीव वीज बिलात 50 टक्के सवलत ग्राहकांना द्यावी. ग्राहकांच्या शंकेचे निरसन करावे. लॉकडाऊन कालावधीत वीज कपात करू नये आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. तसेच 3 दिवसांचा अवधी मनसेकडून देण्यात आला आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नयन कदम यांनी दिला आहे.