मुंबई - मनसेची स्थापना 2006 साली झाली. त्यावेळी माझ्या मनातील झेंडा होता तो हाच झेंडा आहे. शिवतीर्थावरील पहिल्या सभेमध्ये सांगितले होते, माझ्या मनात हाच झेंडा होता. अनेकांनी आपल्यासोबत सर्व असले पाहिजे असा सल्ला दिला. त्यावरून वाद झाला. सर्वांना बरोबर घेऊनच शिवरायांनी राज्य निर्माण केले. माझ्या डोक्यामधून हा झेंडा जात नव्हता. शिवजयंतीच्या वेळी झेंडा बाहेर काढायचे ठरवले होते. जवळपास ६ वर्षांपूर्वी गुढीपाडवा, शिवजयंतीला झेंडा बाहेर काढला आणि आता पक्षाचा झेंडा म्हणून मी हा झेंडा तुमच्यासमोर ठेवला असल्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना स्थापन केली त्यावेळी माझे आजोबा हजर होते. त्याला आजोबांनी नाव दिले. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवाच होता. मात्र, काही कारणामुळे महाराष्ट्र संयुक्त समिती विसकटली. त्यानंतर शिवसेना अस्तित्वात आली. आता जी परिस्थिती आली त्यामुळे मी हा झेंडा आणला, असा समज आहे. मात्र, हा तर निव्वळ योगायोग आहे, असेही ते म्हणाले.
पक्षाचे एक अधिवेशन व्हावे आणि त्यामध्येच आपण झेंडा आणू आणि सर्वांसमोर ठेवू, असे वाटत होते. तो आज आणला. ही महाराजांची राजमुद्रा आहे. त्यामुळे हातात घेतल्यानंतर कुठेही पडलेला दिसता कामा नये. ही राजमुद्रा आपली प्रेरणा आहे. निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही. या राजमुद्रेचा मान राखला गेलाच पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
पक्षाचे झेंडे बदलण्याचे काम मनसेच पहिल्यांदा करत आहे, असे नाही. जनसंघाने देखील त्यांचा झेंडा आणि नाव बदलून भाजप केले. कुठल्याही सकारात्मक गोष्टीसाठी एक बदल गरजेचा असतो. त्यामुळेच झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज ठाकरे म्हणाले.