मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर भाजपकडून मनसेच्या विरोधात 'लाव रे ते पोस्टर' म्हणणारे फ्लेक्स सायन परिसरात लावण्यात आले होते. यावर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून हे पोस्टर तात्काळ हटविण्याची मागणी पोलिसांकडे केली गेली. मात्र, काही कार्यकर्त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.
प्रसाद लाड यांनी केलेल्या आरोपानुसार काही मनसे कार्यकर्त्यांनी प्रसाद लाड यांना फोन करून राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे पोस्टर काढा अन्यथा तुम्हाला बघून घेऊ, असे म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेकडून भाजपच्या विरोधात 'लाव रे व्हीडिओ' म्हणून कॅम्पेन चालविले जात होते.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शिवीगाळ व धमकीवर बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले आहरे राज ठाकरे यांच्यावर आपण टीका केली नसून त्यांचा आजही मनात आदर आहे. मात्र, असे असतानाही पोस्टरवर मनसे कार्यकर्त्यांना राग येत असेल तर त्यांनी समोर येऊन सामना करावा, असे आव्हान प्रसाद लाड यांनी केले आहे.