मुंबई - मुंबई महानगर प्रदेशात अर्थात पनवेल, कल्याण-डोंबिवली परिसरातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणीही मोठ्या संख्येने लोकांना-रुग्णांना क्वारंटाइन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने भाडेतत्त्वावरील 13 हजार घरे त्या त्या पालिकेला क्वारंटाइनसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
एमएमआरडीएकडून मुंबई महानगर प्रदेशात भाडेतत्त्वावरील घरांच्या प्रकल्पाअंतर्गत काही हजार घरे बांधण्यात आली आहेत. यातील काही घरे गिरणी कामगारांसाठी राखीव आहेत. तर उर्वरित तयार घरे पडून आहेत. हीच घरे आता क्वारंटाइनसाठी देण्यात आली आहेत. पनवेल, कल्याण-डोंबिवली अशा ठिकाणी 160 चौ.फुटाची ही घरे आहेत.
पनवेल, कल्याण-अंबरनाथ, बदलापूर या परिसरात रुग्णांची संख्या वाढत असून भविष्यात आणखी रुग्ण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे क्वारंटाइनसाठी मोठ्या संख्येने जागा उपलब्ध करणे गरजेचे होते. त्यानुसार एमएमआरमधील पालिकांनी एमएमआरडीएकडे घरांची मागणी केली होती. त्यानुसार भाडेतत्त्वावरील 13 हजार घरे क्वारंटाइनसाठी त्या त्या पालिकेला देण्यात आल्याची माहिती सहाय्यक महानगर आयुक्त डॉ. बी. जी पवार यांनी दिली.