मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले जात आहेत. मुलुंड येथील रिचर्ड सन्स अँड क्रूडास या कंपनीच्या परिसरात 1 हजार 650 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे लोकार्पण 30 जून रोजी होणार होते. पण काही कारणानिमित्त ते पुढे ढकलण्यात आले. अखेर 7 जुलैला या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात याची सुरुवात अजूनही करण्यात आली नाही. आता लोकार्पण झाल्यानंतर सेंटर चालू कधी होणार? असा सवाल स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी उपस्थित केला आहे.
रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होत नसल्यामुळे हे कोविड सेंटर अजून सुरू झाले नसल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या मुलुंड परिसरातील जकात नाक्यावर १२० खाटांचे एक कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. याची सुरुवातही सेंटर तयार झाल्यानंतर एक ते दीड महिन्याच्या कालावधीनंतर करण्यात आली होती.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसताना, अठराशे खाटांचे नवीन कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. तेव्हाच मेडिकल टीमची व्यवस्था का नाही केली? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मुलुंड आणि भांडुपमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना, लवकरात लवकर हे कोविड सेंटर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
कोविड सेंटरबद्दल थोडक्यात -
पूर्व मुंबई उपनगरात मुलुंडमध्ये रिचर्डसन्स अँड क्रुडस कंपनीच्या परिसरात मुंबई महानगरपालिकेतर्फे 1 हजार 650 खाटांचे जम्बो कोविड केअर फॅसिलिटी तयार करण्यात आली आहे. मोकळ्या मैदानात हे सेंटर उभे करण्यासाठी सिडको महामंडळाला एक महिन्याचा कालावधी लागला. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे सेंटर आहे. ज्यामध्ये तब्बल 952 ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी 26 हजार लिटर ऑक्सिजन बँकची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन बेडस असलेले हे पहिलेच सेंटर आहे. विशेष म्हणजे, हे कोविड केअर सेंटर संपूर्णपणे वातानुकूलित आहे. ज्यामध्ये कॉन्टॅक्ट लेस स्क्रीनिंग सेंटर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी मार्गिका तसेच डेडिकेटेड वाय-फाय सुविधा देखील रुग्णांसाठी देण्यात आली आहे. सोबतच गरम आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील या सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - कोविड रुग्णालयावर 53 कोटींचा खर्च, अनिल गलगली यांची माहिती
हेही वाचा - महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय - शरद पवार