मुंबई - नेस्को कोविड सेंटर तयार करताना एकाच बिल्डरला डेकोरेटर आणि वैद्यकीय साहित्य पुरविण्याचे काम दिले आहे. हे काम देताना पालिकेने त्याचा यापूर्वी अनुभव पाहिला नाही. अशाप्रकारे महापालिकेने वर्ड ऑर्डरमध्ये कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केला आहे.
महानगरपालिकेला नेस्को कोव्हीड सेंटरसाठी 10 कोटी 80 लाख रुपयांची वर्क ऑर्डर काढायची होती, तर त्यासाठी टेंडर का काढलं गेलं नाही? इतका वेळ नव्हता, तर मग महापालिकेच्या ठरलेल्या दरात किंवा बाजार भावाचा विचार न करता हे काम या बिल्डरला कसे दिले? अस सवाल देखील कोटेचा यांनी उपस्थित केला. हे काम तीन महिन्यासाठी रोमेल ग्रुपला देण्यात आले असून त्यामागे साधारण 6 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. मे ते जुलैनंतर आता हे काम याच बिल्डरला पुढील 3 महिन्यासाठी याच वर्क ऑर्डरनुसार देण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास 12 कोटी रुपयांचा घोटाळा यामागे होऊ शकतो, असे कोटेचा म्हणाले.
ज्या वस्तू नेस्को कोव्हीड सेंटरमध्ये या बिल्डरकडून घेण्यात आल्या आहेत, अशा एकूण 23 वस्तूंच्या खर्चाबाबात आम्ही माहिती काढली असता, मोठा भ्रष्टाचार या वर्कऑर्डरमध्ये झाला असल्याचे दिसून आले. याबाबत आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत असून लोकायुक्तकडे सुद्धा याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचे कोटेचा यांनी सांगितले.