मुंबई - आरोग्य विभागाच्या परिक्षेत सकाळच्या पेपरसाठी एक जिल्हा व दुपारच्या पेपरसाठी दुसरा जिल्हा, असा पराक्रम करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी किंवा मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सप्टेंबर महिन्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती या सरकारने केली आहे. 24 ऑक्टोबरच्या परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा 'महापराक्रम' केला आहे. या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आता हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करावी, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
दुसऱ्यांदाही तरुणांना मनस्ताप सहन करावा लागणार
अर्थपूर्ण संवाद करत बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून गोंधळ निर्माण करायचा हाच महाविकास आघाडी सरकारचा 'भ्रष्टाचारी पॅटर्न' बनला असल्याचे वारंवार समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने राज्यातील लाखो परीक्षार्थींनी आक्रोश केला. मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेतानाही या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागणार असल्याचे दिसत असल्याचेही भातखळकर म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तत्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करावी
अनेक परीक्षार्थींनी अर्ज करताना जे केंद्र मागितले ते मिळालेच नाही. अनेक परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळही नाही. त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पडला आहे. त्यामुळे आता या विषयांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे. खासगी यंत्रणेऐवजी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच आपल्या निष्क्रियतेमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या व केवळ खोट्या वल्गना करण्यात धन्यता मानणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तत्काळ मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हेही वाचा - साकीनाका पोलिसांनी 170 मोबाईल केले परत