नवी मुंबई - पर्यटन आणि रोजगार वृध्दी व्हावी, या हेतुने मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. चटकदार आणि खमंग, तर्रीदार आणि तडका मारलेल्या चविष्ट मिसळचा आस्वाद कामोठे सिडको मैदानावर खवय्यांना घेता येणार आहे.
मिसळ हा सर्वांचा आवडता पदार्थ असला तरी मुंबई, नवी मुंबईच्या ठराविक मिसळ खाऊन कंटाळलेल्या खवय्यांना राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या निरनिराळ्या चवींच्या मिसाळचा आस्वाद घेता यावा, म्हणून हा मिसळ महोत्सव भरविला आहे. या महोत्सवात नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील खवय्यांना विविध स्वादाच्या, वेगवेगळ्या चवींच्या मिसळ खाण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
या महोत्सवात काळ्या, तांबड्या, हिरव्या रश्याच्या मिसळसह चुलीवरची गावरान मिसळ, तसेच जैन मिसळ, उपवासाची मिसळ, झणझणीत, चमचमीत, चटकदार, झटका मिसळ यांचाही आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सावात नाशिकपासून नगरची, पुण्यापासून कोल्हापूरची, जुन्नर, कल्याण, ठाणे, चाकण, देहू रोड, कराड, सांगली,पारनेर,सोलापूर, शिरूर,कोकण अशा विविध शहरांच्या चवी एकाच छताखाली चाखता येत आहे.
लहान मुलांसाठी या ठिकाणी बालनागरी उभारली आहे. यात लहान मुलांसाठी विविध खेळणी आहेत. बर्फाचा गोळा, मॉकटेल्स आणि बरेच काही महोत्सवात उपलब्ध आहे. सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत महोत्सव खवय्यांसाठी खुला आहे.