मुंबई : Miss Ocean World २०२३ : जगातील टॉप 12 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलेल्या 'मिस ओशन वर्ल्ड'चा फिनाले' जयपूरच्या 'चोमू पॅलेस' येथे (Chomu Palace Jaipur) पार पडला. तर मिस ओशन वर्ल्डचा फिनाले पहिल्यांदाच भारतात पार (Miss Ocean World Competition) पडलाय. यामध्ये लॉरा युनायटेड किंग्डमने विजेतेपद पटकावलंय. फर्स्ट रनर अप अँड्रिया बल्गेरिया, सेकंड रनर अप अवंती श्रॉफ इंडिया, थर्ड रनर अप मर्सी टांझानिया, चौथी रनर अप जेडेली सुमीन कोरिया होती. यातील आपल्या देशाचे नेतृत्व करणारी अवंती श्रॉफ (Avanti Shroff) ही तरुणी मुंबईत राहते. त्यानिमीत्तानं 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी तिच्यासोबत संवाद साधत स्पर्धेचा अनुभव जाणून घेतलाय.
स्पर्धेच्या काळात होतं थोडं दडपण : 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अवंतीनं सांगितलं की, ही स्पर्धा जागतिक स्थरावरील होती. या स्पर्धेत शेवटच्या फेरीत आम्ही 12 देशांच्या, 12 जणी स्पर्धक होतो. अशा आमच्या एकूण 6 फेऱ्या झाल्या. मी आधी देखील काही स्पर्धा जिंकल्या आहेत. पण, यावेळी मला अभिमान होता आणि दडपणही होतं. कारण, या आधी जितक्या स्पर्धा झाल्या आहेत, त्यात मी माझ्यासाठी खेळत होते. मला त्या स्पर्धा जिंकायच्या होत्या. पण, यावेळी मी 12 देशांच्या स्पर्धकांसमोर आपल्या देशाचं नेतृत्व करत होते. त्यामुळे या स्पर्धेच्या काळात थोडं दडपण आलं होतं.
जलचर होण्याची संधी मिळाली तर काय व्हाल? : पुढे बोलताना अवंतीनं सांगितलं की, या स्पर्धेत आम्हाला विचारलं होतं की तुम्ही समुद्रसृष्टी बचावासाठी आणि संरक्षणासाठी काय करता? मी मुंबईची असल्यानं येथे अनेक संस्था किनारा सफाईचे सामाजिक कार्य केले जाते. मी अशा स्वच्छतेच्या कामात अनेकदा सामील झाले आहे. त्याचा अनुभव मला या स्पर्धेत उपयोगाला आला. एका फेरीत आम्हाला चिठ्ठ्या उचलायला सांगितल्या होत्या. त्यात लिहिलं होत जर तुम्हाला एखादा जलचर होण्याची संधी मिळाली तर काय व्हाल? मी लगेच सांगितलं 'ऑक्टोपस'. कारण त्याला 8 पाय असतात. यामुळे मला जास्त काम करता येईल. त्यामुळं 'ऑक्टोपस'ची निवड मी केली.
अशी असते मुलाखतीची फेरी : या स्पर्धेच्या 6 फेऱ्या घेण्यात आल्या. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करावी लागते. त्या अर्जांची छाननी केली जाते. मग, तुमच्या मुलाखतीची फेरी सुरू होते. त्यानंतर तिथे आलेल्या स्पर्धकांची स्क्रीन टेस्ट घेतली जाते. तुम्ही त्यात पास झालात की, तुमचा आत्मविश्वास पाहिला जातो. या फेरीत तुम्हाला विविध प्रश्न विचारले जातात. या फेरीत अनेक स्पर्धकांना परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. अशा विविध फेऱ्या पार करत स्पर्धकाला पुढं जायचं असतं. विशेष म्हणजे यातच तुम्हाला तुमची संस्कृतीसुद्धा दाखवून द्यायची असते. त्याचबरोबर बुद्धिमत्ता देखील दाखवून द्यायची असते. त्यामुळे एखाद्या स्पर्धा परीक्षेप्रमाणेच या स्पर्धा होतात, अशी माहिती अवंती श्रॉफनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -