मुंबई - राज्यासह राजधानी मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील लोकल बंद केली जाणार नाही मात्र, कठोर निर्बंध लावावे लागतील, असे स्पष्ट संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आज त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
टास्क फोर्स समितीची बैठक -
सध्याची कोरोना परिस्थिती पाहता राज्य सरकार आता कठोर निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गेल्या आठवड्यात प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी सुरू करण्याची आदेश दिले आहेत. लॉकडाउनला सर्वच स्तरातून विरोध होत असल्याने कठोर निर्बंध लावण्याबाबत राज्य स्तरावर विचार विनिमय सुरू झाला आहे. मुंबईच्या महापौरांनीही शुक्रवारपासून मुंबईत अधिक कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा उपलब्ध करणे, खासगी कार्यालयातील कर्मचारी संख्या ५० टक्क्यांनी कमी करणे, चित्रपट, मॉल तसेच प्रार्थनास्थळे बंद करण्याबाबत विचार सुरू असल्याचे महापौर म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्यांनीही वर्षा शासकीय निवासस्थानी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे.
लोकल बंद होणार नाहीत -
दरम्यान, कोरोनासंसर्ग कमी करण्यासाठी काही कठोर निर्बंध लावण्याचे निर्णय घ्यावे लागतील. मात्र, मुंबईतील लोकल बंद होणार नाही, असे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर वरून दिले आहेत. आज(शुक्रवारी) सायंकाळी होणाऱ्या टास्क फार्स समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकल आणि बससाठी विशेष मार्गदर्शक सूचना -
मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल, बीच, गार्डन्स, सभागृह आणि मॉल्सना ठराविक कालावधीसाठी मंजुरी दिली आहे. आता ही ठिकाणेही काही कालावधीसाठी २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दुकाने, बाजारपेठ, फेरीवाल्यांकरिता मार्गदर्शक सूचना लागू केल्या जातील. तसेच उपनगरी लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बससाठी कठोर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर कोविड चाचणी अधिक तीव्र करण्याबाबतच्या उपाययोजना राज्य सरकार आखत आहे. उद्योगधंदे, सेक्टर हाऊसना पूर्ण क्षमतेने काम करण्यास अनुमती दिली जाईल. मात्र, त्यासाठी कोरोना चाचणी आणि नियमावलीचे पालन करणे सक्तीचे असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा - Corona Updates LIVE Page : राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा, वाचा एका क्लिकवर..