मुंबई: महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून गळचेपी होत असल्याचा आरोप करणाऱ्या उद्योग मंत्री शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनांची उधळण ( Uday Samant Appreciation on Sharad Pawar ) केली. नाट्य परिषदेच्या बैठकीत उद्योग मंत्री सामंत यांनी पवार यांच्या नाट्य चळवळीचे गोडवे गाताना रत्नागिरी जिल्ह्यातील नाट्य चळवळ शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना दिलेल्या निधीच्या व्याजातून आजही कार्यरत असल्याचे म्हटले. तसेच, सत्तेत असू किंवा नसो पवार साहेब यांच्या एका फोनवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेऊ शकतात, असे सांगितले. सामंत यांच्याकडून होणाऱ्या कौतुकांमुळे सर्वांच्या भुवयामुळे उंचावल्या.
शरद पवारांवर स्तुति सुमने: राजकीय क्षेत्रात राज्यापासून दिल्लीपर्यंत शरद पवार यांचा वटहुकूम चालतो असे बोलले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शरद पवारांचे बोट धरून राजकारण शिकल्याचे म्हटले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार असताना, शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांचा भडिमार केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा काळ संपल्याची नुकतीच टीका केली होती. परंतु, नाट्य परिषदेच्या बैठकीवेळी उदय सामंत यांनी केलेल्या भाषणातून शरद पवारांचे त्यांनी स्वागत केले आहे.
माझी नियुक्ती पवारांमुळेच: नाट्य चळवळ उभी राहिली पाहिजे, ही शरद पवार यांची संकल्पना आहे. रत्नागिरीतील नाट्य चळवळ देखील पवार यांच्यामुळे सुरू आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळातील काही निधी काढून रत्नागिरी नाट्य परिषदेला देत शासनादेश काढला. त्यात या निधीच्या व्याजातून नाट्य परिषदेचे कार्यक्रम झाले पाहिजे, हा निधी अन्य कुठे वापरता येणार नाही, असे नमूद केले. रत्नागिरीतील सगळे नाट्यकर्मी तेथील नाट्य स्पर्धा, एकांकिका, रेकॉर्ड डान्स स्पर्धा पवार मुख्यमंत्री असताना दिलेल्या निधीच्या व्याजातून करत असल्याचे स्पष्ट केले. त्याच धर्तीवर काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. शरद पवार यांच्यामुळेच मराठी नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून माझी नेमणूक झाल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.
पवारांनी सांगितले तर तात्काळ बैठक: नाट्य परिषदेच्या माध्यमातून नवीन नाट्यगृह बांधायचा आहे. कशा प्रकारे बांधकाम करायचं हे आपली जबाबदारी आहे. शरद पवार यांना याबाबत माहिती दिल्यानंतर शासनाचा अधिकार त्यात असावा, असा सल्ला देत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे संयुक्त बैठक घेण्यास सांगण्याची सूचना केली. दरम्यान, मंत्री आणि नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेनच. परंतु, शरद पवार यांनी एक कॉल केल्यास तात्काळ बैठक लागू शकते. तुम्ही लक्ष घालावे, अशी विनंती उदय सामंत केली.