मुंबई - राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. बर्ड फ्लू बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे, अशी माहिती केदार यांनी दिली.
इतकी दिली जाणार नुकसान भरपाई -
पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्टअंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु ७०/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रू. ३५/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी , अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाणार आहे.
मांस, अंडी खाणे सुरक्षित -
कुक्कुट पक्षांचे मांस व अडी हा प्रथिनांचा स्वस्तात उपलब्ध होणारा स्त्रोत आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहनही केदार यांनी केले आहे.
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे जयंती: अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी
हेही वाचा - भारतीय डाक विभागाचे बनावट किसान पत्र बनविणाऱ्या टोळीला अटक