मुंबई : भाजपमध्ये गेलेले नारायण राणे, विनायक मेटे आदी गॅंगने राज्यात मराठा आरक्षणावर राजकारण करू नये. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला. राणे आणि मेटे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करत त्यांनी राजकारण करू नये असेही सुनावले.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालानंतर महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण द्यायचेच नव्हते, असा आरोप खासदार नारायण राणे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काल केला होता. या आरोपाचा समाचार घेत मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मलिक यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आरोपांचे खंडन केले. आम्ही या आरक्षणाच्या संदर्भात कोणताही वकील बदललेला नव्हता. भाजपने दिलेले वकिलच आम्ही ठेवले होते. यासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु, काहीजण राज्यातील मराठा समाजात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या गॅंगनी या विषयाचे राजकारण करू नये, त्यापेक्षा या विषयावर पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांना त्यांनी या आरक्षणाला मदत करण्यासाठी सांगितले पाहिजे. तसेच, त्यासाठी कोर्टात हा मुद्दा हाताळला पाहिजे, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महामंडळाच्या नियुक्त्यांबाबत चर्चा केली. काही गोष्टी प्रलंबित आहेत, त्या या महिन्याच्या अखेरपर्यंत मार्गी लावाव्यात, असे आदेश आम्हाला दिले आहेत. तसेच कार्यकर्त्यांना महामंडळाची जबाबदारी दिली पाहिजे, त्यांनी अशा सूचना आम्हाला दिल्या असल्याची माहिती मलिक यांनी दिली. भाजपातील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात विचारले असता मलिक म्हणाले, मागील सरकारमध्ये जे पाच वर्षात झाले ते आता लोकांसमोर येत आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी जे आरोप केले त्यासाठी उशीर केला. आज खडसे सांगत आहेत ते काही नवीन नाही. अन्याय होताना ते बोलले असते तर जनतेने त्यांना न्याय दिला असता, असेही मलिक म्हणाले.
कंगना रणौतबाबत बोलताना मलिक म्हणाले, कंगना रणौतची येथील नेत्यांशी भांडण नाहीच. तर, भाजपमध्ये ज्या कलाकारांना संधी मिळाली ती जागा कशी मिळेल यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. अनुपम खेरसारख्या लोकांनी याचा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! मे २०२१ पासून मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ होणार सुरू