मुंबई - ड्रग्ज क्रुझ प्रकरणावर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ज्यादिवशी क्रुझवर छापेमारी करण्यात आली, त्यादिवशी समीर वानखेडेने माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी 8-10 लोकांना पकडल्याचे सांगितले. मात्र, हे खोटे आहे. त्यात 11 जण होते.
मुंबई पोलिसांजवळ सकाळपर्यंत पूर्ण माहिती होती. यानंतर बातम्या आल्या की, 8 लोकांनाच पकडण्यात आले. त्यात तीन जणांना सोडण्यात आले आहे.
श्रृषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमीर फर्निचरवाला या तीन लोकांना सोडण्यात आल्याचा दावा मंत्री नवाब मलिकांनी केला. श्रृषभ सचदेवा हे भाजपच्या युवा मोर्चाचे मोहित कंबोज यांचे शालक आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. श्रृषभ सचदेवाला पकडल्यानंतर त्यांना दोन तासात सोडण्यात आले. सोडण्यात आले त्यावेळी त्याचे वडीलही सोबत होते. जेव्हा सुनावणी होत होती, त्यावेळी कोर्टात यांचे नाव आले आहे. 1300 लोकांच्या जहाजावर छापा टाकण्यात आला. 12 तास हा छापा चालला. त्यात फक्त तुम्ही 11 लोकांना पकडले. यानंतर सर्वांना एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले. मात्र, यातील तीन जणांना सोडण्यासाठी एनसीबीला कोणी आदेश दिला? याचा खुलासा समीर वानखेडेंनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.
या तिघांना याठिकाणी का आणले, का सोडण्यात आले, याची माहिती द्यावी. समीर वानखेडेची कॉल रेकॉर्ड्स काढण्यात यावे. समीर वानखेडे यांचे भाजपच्या दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील नेत्यांसोबत संभाषण झाले आहे. याचा तपास व्हावा.