मुंबई - मुंगेरीलाल के सपने सर्वांना माहित आहे, त्याच प्रकारे आता मुनगंटीवार यांना सत्तेची स्वप्न पडत आहेत. मात्र, त्यांची स्वप्न काही खरी होणारी नाहीत. आम्ही लवकरच मुनगंटीवार के सपने असे पुस्तक प्रकाशित करू, असे म्हणत अनेकदा पक्ष फोडीचा प्रयत्न करून सरकार अस्थिर करण्याची भाजपची परंपरा आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. ते विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
सरकार पडेल आणि आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असे भाजपचे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. भाजपचेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सरकार कोणत्याही स्तिथीत पडणार नसल्याचा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मध्यप्रदेशात सरकार अस्थिर असून केव्हा ही भाजपचे सरकार येऊ शकते, महाराष्ट्रातही काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. यावर जयंत पाटील यांनी हे उत्तर दिले. आमच्या कडून भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार सध्या आमच्या संपर्कात आहेत. मात्र, पक्षांतर घडवून सरकार बांधण्याचा सध्या आमचा कोणताही विचार नाही. कधी भावनिक मुद्द्यावर तर कधी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये फूट पडेल याची वाट भाजप पाहत आहे. मात्र, असे काहीही घडणार नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी योग्य 'दिशा', ..महिला पोलिसांच्या संख्येत करणार वाढ'