मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने आज सकाळी धाड टाकली. राजकीय सुडाची कारवाई सुरू असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. भाजपला समर्थन दिल्यानंतर कारवाई थांबल्याचे विरोधकांनी टीकास्त्र सोडले. मंत्री दादा भुसे यांनी, विरोधकांचे आरोप खोडून काढताना, कोणत्याही नेत्यावरची कारवाई थांबलेली नाही. आजही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. याविधानाने चौकशीच्या रडारवर असलेल्या नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.
ईडीचे छापेमारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी ईडीचा छापा टाकला. सध्या ईडी आणि प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांचे घर, कार्यालय आणि नातेवाईकांच्या घरी झाडाझडती घेण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. आघाडी सरकारच्या काळात मुश्रीफ यांची चौकशी करण्यात आली. मात्र सरकार पडल्यानंतर चौकशीचा ससेमिरा थांबला होता.
नेत्यांची चौकशी सुरूच : आज, पुन्हा एकदा ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात करावाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे. मुश्रीफ यांनी भाजपवर सडकून टीका केली. आघाडी सरकारच्या काळात शिंदे गटातील अनेकांवर आरोप झाले. भाजपला समर्थन दिल्यानंतर ही चौकशी थांबली, असा आरोप विरोधकांनी केला. मंत्री दादाजी भुसे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. अनियमितता आढळणाऱ्या बाबींची केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशी केली जाते. एखाद्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. कायद्यानुसार त्यांना चौकशीचे अधिकार आहेत.
नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार : मंत्री दादा भूसे पुढे म्हणाले की, शिंदे गटाच्या नेत्यांची चौकशी थांबली, असं कुठेही नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणांच्या चौकशी प्रक्रियेनुसार त्या त्या प्रकरणांबाबत कार्यवाही केली जात आहे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी भाजपला सपोर्ट केलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांवर आजही टांगती तलवार असल्याचे बोलले जाते. अशातच भुसे यांनीच केलेल्या गौप्यस्फोटमुळे नेत्यांची धाकधूक वाढली आहे.