मुंबई- राज्यातील दूध व्यवसाय 5 महिन्यापासून आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील दूध संघाच्या उलाढालीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून दूध संघाना दररोज 2 ते 3 कोटींचा फटका बसत आहे. कोरोनामुळे राज्यातील दुग्ध व्यवसायाचे आर्थिक समीकरण पूर्णपणे विस्कटले असून ते पुन्हा सुरळीत होण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा दूध संघ आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यात दररोज सरासरी 2 कोटी 10 लाख लिटर दुधाचे संकलन होते. जागतिक बाजारात 370 रुपये प्रति किलोपर्यंत असलेले दूध पावडरचे दर आता 155 रुपयांपर्यंत घसरले आहेत. फेब्रुवारी ते मे महिन्यात आईस्क्रीम, ज्यूस, ताक, सुगंधी दूध व इतर पदार्थांना मोठी मागणी असते. लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळे, जत्रा, यावर आलेली बंधने, विविध परीक्षांच्या निकालांप्रसंगी पेढ्याचे वाटप केले जाते. यंदा मात्र, हे चित्र पाहायला मिळाले नाही. दुग्धजन्य पदार्थांची घटलेली विक्री, कमी झालेले दूध संकलन, सरकारने बंद केलेली दूध खरेदी, पिशवी बंद दूधाच्या विक्रीत झालेली घट , आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूधाच्या पावडरचे कमी झालेले दर यामुळे दूध संघांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
जून, जुलै, ऑगस्ट हे सणासुदीचे दिवस असतात. या दिवसांमध्येही दुधापासून बनवलेल्या मिठाईजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती अहमदनगर कल्याणकारी दूध उत्पादन संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
औरंगाबाद जिल्हा दूध सहकारी संघाचे दररोज दीड लाखांचे नुकसान
औरंगाबाद जिल्हा दूध सहकारी संघाच्या वतीने रोज 80 ते 85 हजार लिटर दूध शेतकऱ्यांकडून घेतले जाते. त्यापैकी सध्या 30 हजार लिटर दुधाची विक्री बाजारात पिशव्यांमधून केली जाते. लॉकडाऊन पूर्वी दररोज 50 हजार लिटर दूधाची विक्री होत असे. दीड ते दोन हजार लिटर दूध दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी लागत आहे. दही, ताक, खवा, पनीर, अशा दूध पदार्थांची विक्री कमी झाली आहे. दूध संघाकडून शेतकऱ्यांना 25 रुपये प्रति लिटर दुधासाठी दर दिला जातो. मात्र, शिल्लक राहिलेले दूध खासगी दूध संघांना दिले जाते त्याचा दर 21 रुपये प्रति लिटर आहे. वाहतुकीचा खर्च धरुन दूध संघांना प्रतिलिटर 5 रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
शिर्डीतील गोदावरी दूध संघाची उलाढाल 4 कोटींवरुन 1 कोटींवर
गोदावरी दूध संघाची महिन्याची आर्थिक उलाढाल 4 कोटी रुपयांची होती. मात्र, लॉकडाऊनचा फटका दूध संघाला बसला आहे. सरकारकडून पावडर बनवण्यासाठी घेतले जात असलेले दूध 26 जुलै पासून घेणे बंद केले आहे. मोठी शहरे पण बंद असल्याने ग्राहकांकडून दूध कमी घेत असल्याने महिन्याची 4 कोटींची उलाढाल 1 कोटी रुपयांवर आली आहे, असे राजेश परजणे यांनी म्हटले आहे.
वर्धा येथील गोवर्धन गोरस भंडारला 45 लाखांचा तोटा
गोरस भंडार संस्थेवर 1 हजार जण अवलंबून आहेत. लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे सरासरी 5 हजार लोकांचे अर्थकारण प्रभावित झाले आहे. वर्षाला 27 कोटींच्या घरात उलाढाल असणाऱ्या गोरस भंडारला लॉकडाऊनमुळे तीन ते चार महिन्यात 45 लाख रुपयांचा तोटा झाला आहे.
दूध संघासमोरील अडचणी-
लॉकडाऊन काळात वाहतुकीवर मर्यादा आणल्या गेल्या होत्या. यामुळे दूध संघाना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बाजारपेठेपर्यंत पोहचवण्यात अडचणी आल्या. शासनाकडून केली जाणारी दूध खरेदी 26 जुलैपासून बंद झाल्यामुळे दूध संघापुढे दुधाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध भूकटीच्या दरात घसरण झाल्याचा फटका दूध संघाना परिणामी शेतकऱ्यांना बसला आहे. दूध संघांकडून दूधाचे दर कमी करण्यात आले आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थ्यांच्या विक्रीत घट झाल्यामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
दूध दर कमी झाल्याने शेतकरी संकटात
लॉकडाऊन काळात दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना देखील तोटा होत आहे. दुसरीकडे जनावरांना लागणारा चाराही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने त्याचे दर वाढले आहेत, असे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी गजानन लोखंडे यांच्याकडे 26 गायी होत्या. तोटा वाढत असल्याने त्यांनी काही गायी विकून तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुग्धजन्य पदार्थ विक्रेते अडचणीत
गोरस भंडारची शहरात 12 विक्री केंद्र आहेत. या केंद्रामधून कच्चे दूध, गोड गरम केलेले दूध, बसण्याची व्यवस्था आहे. ब्रेड, गोरसपाक, पेढा विक्री केली जात होती. यासह बासुंदी, तूप, श्रीखंड, खवा पनीर असे 17 पदार्थ विक्री केले जायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे केवळ कच्चे दूध विक्रीस जात आहे. इतर पदार्थांची मागणी निम्यावर आल्याचे गोरस भंडार रामनगरचे चालक रघुनंदन खडतकर यांनी ईटीव्ही भारताला सांगितले.
दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाईची विक्री कमी झाली आहे. यावर्षी दहावी बारावी परीक्षांचा निकाल पेढ्यांविना झाला, असे औरंगाबादमधील प्रभा डेअरीचे राजेश जैन म्हटले आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना दूध संघाला देखील लॉकडाऊनचा फटका बसला आहे. कोयना दूध संघाकडून यावर्षी पेढ्यांची निर्मिती कमी प्रमाणात करण्यात आली.