मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ अर्थात म्हाडाच्या वतीने राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे दिली जातात. मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांसाठी ग्राहकांकडून हजारो अर्ज दाखल होतात. काही घरांसाठी येणाऱ्या हजारो अर्जांमुळे अजूनही म्हाडाच्या घरांना मोठ्या प्रमाणात मुंबई शहर आणि परिसरात मागणी असल्याचे दिसून येते. मुंबईत असलेली घरांची कमतरता आणि गगनाला भिडलेला दर हे यामागील कारण आहे. मात्र म्हाडाची राज्यभरातील घरांच्या विक्रीची स्थिती मात्र या उलट आहे.
म्हाडाची 14 हजार घरे पडून : म्हाडाच्या वतीने राज्यभरात बांधण्यात आलेली सुमारे 14000 घरे ग्राहकांच्या मागणी विना पडून आहेत. या घरांसाठी ग्राहकांनी अर्ज करावेत यासाठी म्हाडाकडून वारंवार आवाहन करण्यात येते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे म्हाडाने प्रकल्पासाठी निवडलेली स्थळे हे आहे. म्हाडाने शहरापासून दूर कुठेतरी टेकडी अथवा डोंगराच्या बाजूला किंवा जिथे फारशी संपर्क यंत्रणा नाही अशा ठिकाणी प्रकल्प उभे केले आहेत. काही ठिकाणी स्मशानभूमीला लागून प्रकल्प उभे केले आहेत. तसेच जिथे प्रकल्प उभे केले आहेत तिथे पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात म्हाडा अपयशी ठरले आहे. अशा विविध कारणांमुळे म्हाडाची ही घरे विकली जात नाहीत.
म्हाडांच्या घराची किंमत दुप्पट : विशेष म्हणजे राज्यातील कल्याण विरार, वसई, पुणे, संभाजीनगर, श्रीरामपूर, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी बांधण्यात आलेली घरे ही स्थानिक खाजगी विकासाकांनी बांधलेल्या घरांच्या किमतीच्या अगदी दुप्पट आहेत. त्याच ठिकाणी शासनाचा महाहाऊसिंग किंवा पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्प जर 2200 रुपये प्रति चौरस फुटाने बांधकाम होत असेल तर, म्हाडाने तेच बांधकाम साडेचार हजार रुपये प्रति चौरस फुटाने केल्याचे म्हटले आहे. वास्तविक एकाच शहरात एकाच ठिकाणी बांधकामांची किंमत दुपटीपेक्षा अधिक होणे यामागे नेमका कुणाचा स्वार्थ आहे, तसेच कोणाचे हित साधले जाते हे स्पष्ट असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या शहरात घरे पडून : म्हाडाने राज्यभरात बांधलेल्या अनेक प्रकल्पातील शेकडो घरे आज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी वसई विरारमध्ये 4000 घरांपैकी 2300 घरे पडून आहेत. पुण्यातील 4800 घरांपैकी 2500 घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूरमध्ये हजार घरे पडून आहेत. नाशिकमध्ये हजार पैकी सहाशे घरे पडून आहेत. श्रीरामपूरमध्ये चारशे घरे पडून आहेत. तर कल्याण तालुक्यात बांधण्यात आलेल्या दहा हजार घरांपैकी सुमारे साडेसहा हजार घरे पडून आहेत. संभाजी नगरातही हजार घरे ग्राहकांविना पडून असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा -