मुंबई - जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला असताना महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे बंदी घातलेल्या देशातील लोक दुसऱ्या देशांच्या मार्गे महाराष्ट्रात येत आहेत, असा धक्कादायक खुलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. तर गुरुवारी दुपारपर्यंत हा आकडा 47 इतका होता. त्यात दोन रुग्णांची भर पडली आहे. यात एक रुग्ण लंडनवरून आलेला आहे. तर दुसरा दुबईहून घरी परतला आहे.
वाढलेल्या आकड्यांविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोनामुळे बंदी घातलेल्या देशातील लोक दुसऱ्या देशांच्या मार्गे महाराष्ट्रात येत असल्याचे ते म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती दिली. 'राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 49 वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र, आता ही संख्या वाढली आहे. यातील 40 जण बाहेरच्या देशांमधून आलेले आहेत, असेही मंत्री त्यांनी सांगितले. यातील मुंबईतील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. तरी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले. तसेच 'प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. 31 तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असेही मंत्री टोपे यांनी म्हणाले आहेत.
हेही वाचा - एसीचा वापर टाळा, राज्य सरकारचे तातडीचे परिपत्रक
पुण्यात आयटी सेक्टरमध्ये 100 टक्के 'वर्क फ्रॉम होम' करण्यात आले आहे. बुधवारी रात्री याबाबत आदेश निघाले आहेत. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही महाराष्ट्रात नियमांची अंमलबजावणी करत आहोत. तर मुंबई-पुणे बससेवा बंद करण्यात आलेली नाही. मात्र, लोकांनी कार्यालयात येणं टाळावे. प्रवास टाळावा, फेज थ्रीमध्ये जाण्यापासून आपला बचाव कसा होईल याची काळजी आम्ही घेत आहोत. ट्रेन बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. लोकांनी मात्र ती वेळ आमच्यावर आणू नये, असेही त्यांनी सांगितले.