मुंबई- हवामान खात्याकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. १४ जूनला अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळसदृष्य परिस्थिती निर्माण होत असल्याने हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
'वायू' असे या चक्रीवादळाचे नाव असून त्याचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोणताही धोका पोहचणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा अतिउष्णतेमुळे पडलेला वळवाचा पाऊस आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परिस्थिती निर्माण होत आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर जात गुजरात सौराष्ट्रच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस होसाळीकर यांनी दिली आहे.
काल मुंबईत पडलेल्या पावसामुळे मुंबईकर काही काळ सुखावला होता. पण या सरी मान्सूनपूर्व सरी नसून वळवाचा पाऊस होता. महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्यासाठी अजून ८ ते १० दिवसांचा कालावधी लागेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यावेळी कोकणात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस समुद्रात मासेमाऱ्यांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.