मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Emperor of HinduHeart Balasaheb Thackeray ) यांचा पहिला स्मृतिदिन येत्या १७ नोव्हेंबरला होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे 16 नोव्हेंबरला एकदिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री, आमदार, प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना शिबिरासाठी बोलवण्यात येणार आहे. आगामी निवडणुका आणि रणनीतीबाबत धोरण आखले जाणार असल्याचे समजते.
बाळासाहेबांचा दहावा स्मृतिदिन : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 17 नोव्हेंबर 2012 रोजी जगाचा निरोप घेतला. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या नसानसात स्वाभिमानच भिनवला. त्यांच्या विचारांनी, कर्तृत्त्वाने मराठी आणि हिंदूं माणसाच्या मनगटात ताकद भरली. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी मराठी माणसाच्या मनात भिनवली. बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत, धगधगते विचार आजही महाराष्ट्रालच नव्हे तर संपुर्ण देशाला प्रेरणा देत आहेत. येत्या 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांचा दहावा स्मृतिदिन आहे. दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शिवतिर्थावर जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहतात.
एकदिवसीय शिबिराचे आयोजन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेत यंदा फूट पडली आहे. फुटीनंतर बाळासाहेबांचे पहिले स्मृतिदिन आहे. शिंदे गटाकडून आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार, खरी शिवसेना आमची, असा दावा करण्यात येतो आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या पक्षाचे आणि चिन्हांचे दोन भाग झाले आहेत. दोन्ही गटातील वाद दिवसागणिक शिगेला पोहचतो आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने शिंदे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे 16 नोव्हेंबर रोजी एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
बाळासाहेबांच्या विचारांवर पुढील रणनीती ठरवली जाणार : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक ठिकाणी आपली छाप पडण्याचा प्रयत्न करत असतात. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री शिंदे आघाडीवर होते. आता बाळासाहेबांच्या स्मृतिदिनावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यानुसार मार्गदर्शन शिबिर घेऊन मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या विचारांवर पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचे समजते. शिंदे गटातील आमदारांकडून बेताल वक्तव्य वाढली आहेत. परिणामी, शिंदे सरकार अडचणीत येत आहे. बेतालांना यावेळी आवर घालण्यासाठी शिंदेकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते.