मुंबई : राष्ट्रीय महिला आयोग सदस्या चंद्रमुखी देवी यांनी आज साकीनाका बलात्कार प्रकरणी घटनास्थळ, पीडितेचे कुटुंब आणि साकिनाका पोलीस ठाण्याला भेट दिली. दरम्यान, साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा काल (11 सप्टेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलिसांचे वक्तव्य निंदणीय - देवी
'महाराष्टात गेल्या दोन वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना झालेली नाही. रात्रीची गस्त वाढवावी. कोणत्याही महिलांच्या चारित्र्यावर बोलू नये. पोलिसांचा धाक राहिला नाही. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात बलात्काराच्या घटनात वाढ झाली आहे. पोलीस आयुक्तांनी पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहचू देऊ शकत नाही हे वक्तव्य केले. हे निंदयानिय आहे. पीडित महिलेच्या परिवाराची भेट घेतली आहे. त्यांना योग्य ती मदत देण्यास सांगू. तसेच हा रिपोर्ट उद्याच महिला आयोगाकडे सोपवणार आहे. त्यानंतर हा रिपोर्ट मंत्रालयात जाईल' असे चंद्रमुखी देवी यांनी म्हटले आहे.
आरोपींना पोलिसांचा धाक राहिला नाही - देवी
'आरोपी मोकाट सुटले आहेत. त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करणे करजेचे आहे. आपला धाक निर्माण केला पाहिजे, जेणेकरून आरोपी असे कृत्य करण्यास धजवणार नाही' असेही चंद्रमुखी यांनी म्हटले.
राज्य सरकार महिलांबाबत असंवेदनशील - राष्ट्रीय महिला आयोग
'महाराष्ट्रात राज्य महिला आयोग नसल्याने आम्हाला वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे. यांना महिलांबाबत कोणतीही चिंता नाही आहे. राज्य सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवं', असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे 9 सप्टेंबरच्या रात्री तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला मिळाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्यात आल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिचा काल मृत्यू झाला.
एका आरोपीला अटक
याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी दिली.
मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती
राजधानी दिल्लीत आठ वर्षांपूर्वी चालत्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. निर्भया असे या पीडितेला नाव देण्यात आले आणि महिला सुरक्षेची चळवळ संपूर्ण देशात ऊभी राहिली. यानंतर दिल्लीसह देशभरात आंदोलने झाले. आरोपींना अखेर फाशीची शिक्षा देण्यात आली.
उल्हासनगमध्येही बलात्कार
उल्हासनगमध्येही बलात्काराची घटना घडली आहे. हातोडीचा धाक दाखवून उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पडक्या घरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीकांत गायकवाड असे नराधमाचे नाव आहे.