मुंबई - शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केले होते. त्याला प्रतिसाद देत गोरेगाव येथील प्रबोधनी मीनाताई ठाकरे रक्तपेढीने लॉकडाऊन कालावधीत १० पेक्षा जास्त रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यामुळे आता ही रक्तपेढी कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांसाठी आधार ठरत आहे.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १५ दिवसांपूर्वी रक्तदान शिबरे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मीनाताई ठाकरे रक्तपेढीने १० पेक्षा जास्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामधून ४५० पेक्षा जास्त पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. या कोरोनाच्या आपत्तीमध्ये आता पुरेसा रक्तसाठा उपलब्ध झाला असून येथील कर्मचारी २४ तास सेवा देण्यास तत्पर आहेत.