मुंबई - वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडले आहे. हा प्रश्न न सोडविल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. सरकारच्या चुकीमुळे न्यायालयात मराठा आरक्षणानुसार प्रवेश प्रक्रिया होऊ शकली नाही. सरकारने त्वरित या संदर्भात अध्यादेश काढून वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलक डॉ. वंदना गव्हाणे या विद्यार्थिनीने केली आहे. यावेळी सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजही केली.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पदव्युत्तर दंत वैद्यकीय प्रवेशासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना, मराठा अर्सखानाचा कायदा लागू होण्याआधी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने मराठा आरक्षणानुसार प्रवेश देता येणार नसल्याचा निर्णय दिला होता. त्यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, नागपूर खंडपीठाचा निर्णय अबाधित ठेवत सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी मराठा आरक्षणानुसार दंत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश होणार नसल्याचे सांगितले होते. न्यायालयाचा या निर्णयामुळे तब्बल २५० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सरकराने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी करत गेले सात दिवस मराठा विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.
मंत्रालयात मुख्यमंत्री नसल्याने अजित पवार निघून गेले
आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांची आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचीही भेट घेतली. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहचले. मात्र, मुख्यमंत्री मंत्रालयात उपस्थित नसल्याची माहिती मिळताच अजित पवार आल्या पावली परतले.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या आंदोलनाला प्रतिसादा दिल्याने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचे विद्यार्थी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ठाण्यात गेले आहेत. विद्यार्थ्यांचे शिष्ठमंडळ ठाण्यात राज ठाकरेंची भेट घेणार आहे. आंदोलनाला राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.