मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याचे मार्ग दिसत नाहीत. न्याय मिळावा यासाठी, विद्यार्थी आझाद मैदान येथे मागील ८ दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत २ तासात प्रवेश प्रक्रियेतील मुदवाढीची नोटीस काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, तब्बल १३ तासानंतर नोटीस वेबसाईटवर अपलोड करण्यात आली. पण त्यातही त्रुटी असल्याचा आरोप आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
शासनाने वैद्यकीय प्रवेशाची ७ दिवसाची मुदत वाढवण्याचे परिपत्रक काढले आहे. मात्र विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. परिपत्रकात स्पष्टपणे माहिती न दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आमचे प्रवेश होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
सर्वोच न्यायालयाने यावर्षी मराठा आरक्षणानुसार पदव्युत्तर प्रवेश देण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे शेकडो मराठा विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर गेले ८ दिवस मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.