मुंबई : जगात जर्मनी आणि जर्मनीत मुंबईचा बोलबाला असे मात्र म्हणू शकतो. त्याला कारणही तसेच आहे. मुंबईतल्या एका तरुणीने आपले माहेर गाठण्यासाठी जर्मनीहुन आपली टू व्हीलर काढली (Removed its two wheeler from Germany) आणि तब्बल 24 हजार किलोमीटरचा प्रवास करत मुंबई गाठली. मुंबईत येऊन आपल्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यामुळे इतक्या लांब पल्याचे अंतर टू व्हीलरने पार केल्यामुळे या तरुणीची फक्त देशातच नाही तर जर्मनीतदेखील चर्चा सुरू आहे.
हनिमून रोड ट्रिप : जर्मनी ते मुंबई असा तब्बल पंचवीस हजार किलोमीटरचा प्रवास बाईकने करणाऱ्या या तरुणीचे नाव मेधा राय आहे. मेधा मागच्या काही वर्षांपासून जर्मनीत वास्तव्याला आहेत. या प्रवासाची कल्पना कशी सुचली आणि कसा होता हा प्रवास? याबाबत माहिती देताना मेधा राय यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये मी व माझ्या मित्राने कोर्ट मॅरेज केले. कोविडमुळे लॉकडाऊन असल्याने माझ्या घरच्यांना मुंबईतून जर्मनीला लग्नासाठी येता आले नाही. त्यांना व्हिसा मिळत नव्हता. त्याच वेळी आम्ही ठरवले होते की आपल्या हनिमून पिरेडमध्ये आपण जर्मनी ते मुंबई असा रोड ट्रिप ने प्रवास करायचा आणि आपणच आई-वडिलांना भेटायला जायचे.
म्हणून ठरवले दुचाकीने फिरायचे : पुढे बोलताना मेधा राय सांगतात की, माझा पती हॉक व्हिक्टर हा देखील इंजिनियर आहे. तो 2013 मध्ये मुंबईत काही कामानिमित्त आला होता. तब्बल दीड वर्ष मुंबईत राहिला होता. त्याचवेळी आमची ओळख झाली आणि प्रेम देखील झाले. अखेर मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये आम्ही कोर्ट मॅरेज केले. हॉक आणि मी जेव्हा भारत आणि जर्मनी बद्दल बोलतो. तेव्हा या दोन्ही देशांमध्ये प्रचंड मोठी तफावत असल्याचं हॉक मला सांगतो. भारतात येणे म्हणजे हॉकला कुठल्यातरी वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखे वाटते. मात्र, हे इतके बदल कसे होत जातात? हे आमच्या कधीच लक्षात आले नाही. कारण, आजपर्यंत आम्ही जो प्रवास केला तो विमानाने होता. त्यामुळे या दोन प्रांतात होणारे बदल हे विमानात अनुभवता येत नाहीत. अखेर हे बदल अनुभवण्यासाठी आम्ही जर्मनी ते मुंबई दुचाकीने येण्याचा प्लॅन तयार केला. यात आम्हाला जर्मनी ते मुंबई नेमके कसे टप्प्याटप्प्यावर बदल होत जातात हे अनुभवायचं होते.
156 दिवस, 18 देश, 25 हजार किलोमीटरचा प्रवास : रोड ट्रिपने जायचे तर ठरले. मात्र, हा प्रवास कसा करायचा? हा मेधा यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. सुरुवातीला त्यांनी एक ट्रॅव्हलिंग कार भाड्याने घ्यायची असे ठरवले. मात्र, त्याचा खर्च हा खूप जास्त होत होता असे मेधा सांगतात. अखेर त्यांनी दुचाकीने प्रवास करायचा ठरवले. त्यानुसार त्यांनी एक दुचाकी देखील घेतली आणि थोडा प्रवास करून पाहिला. मात्र, एकाच दुचाकीवरून दोघांनी प्रवास करणे हे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारण, लांबचा पल्ला असल्याने मागे बसणाऱ्या व्यक्तीला मणक्याचा त्रास होऊ शकतो. अखेर त्यांनी आणखी एक दुचाकी घेतली. विशेष म्हणजे या प्रवासाला सुरुवात करण्याआधी मेधा यांना टू व्हीलर चालवता येत नव्हती. या प्रवासासाठी त्यांनी खास दुचाकी चालवण्याच प्रशिक्षण घेतले. त्यातले खचखळगे समजून घेतले आणि जर्मनीतून त्या प्रवासाला निघाल्या. या प्रवासात त्यांनी तब्बल 18 देशातून प्रवास केला. त्यांना 25 हजार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 156 दिवस लागले.