मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. येत्या गणेशोत्सवात गर्दी होऊन तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही तिसरी लाट येऊ नये म्हणून "माझं घर, माझा बाप्पा" तसेच "माझं मंडळ, माझा बाप्पा" ही संकल्पना राबवावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणही कोणाकडे गणेश दर्शनासाठी जाणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.
कोरोनाचा प्रसार रोखा
मुंबईतील शिक्षकांना महापौर शिक्षक पुरस्काराचे वितरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी कोणाच्या घरी जाऊ नये, कोणाला आपल्या घरी बोलवू नये, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या कार्यकर्त्यांना काम नेमून द्यावे, जेणेकरून मंडपात बाहेरची लोक न आल्यास गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा प्रसार रोखता येईल. यासाठी सर्वांनी आपल्या घरात आणि मंडळांनी मंडपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
मी कुठेही जाणार नाही
आमच्यासारखे राजकारणी जिथे जातात त्याठिकाणी गर्दी होते. गर्दी करू नका म्हटल तरी पन्नास कार्यकर्ते जमतात आणि गर्दी होते. मुख्यमंत्र्यांनी गर्दी करू नका, असे आवाहन केले आहे. त्यानुसार मी कोणत्याही गणेशोत्सव मंडळांना भेट देणार नाही तसेच कोणाच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार नाही, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
नागपूर येथे तिसरी लाट आल्याने निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे तेथील पालकमंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले आहे. मंत्री नवाब मलिक यांनीही गर्दी होणार नाही असे राष्ट्रवादीचे कार्यक्रम करू, असे म्हटले आहे. कालच पालिका सभागृहात भाजपचे नगरसेवक सुनील यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबईकरांनी गर्दी होईल अशा ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, हात सॅनिटाइझ करावेत, असे आवाहन महापौरांनी केले.
हेही वाचा - अखेर परमबीर सिंह यांच्याविरोधात अटक वारंट जारी; चांदीवाल आयोगाचा निर्णय