मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री दाऊद हस्तकाकडून उडवण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार कॉल्स आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मातोश्रीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
तर वांद्रे खेरवादी पोलीस स्थानकात काही शिवसैनिकांनी याबाबत तक्रार केल्याची देखील माहिती मिळत आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. याबाबत त्यांनी पुढील सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत. वांद्रे येथील मातोश्री उडवण्याची धमकी आल्यानंतर शिवसेना नेते यांनीदेखील काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, मातोश्री उडवून देण्याची धमकी आल्याचे आम्ही ऐकले आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी याबाबत अधिकृत भाष्य केले नाही. अशा धमक्या येत असतात, त्यांना शिवसैनिक भिख घालत नाही. पोलीस आपले काम करतील. ज्यांनी कुणी हा खुळचटपणा केला आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे. मातोश्रीवर कधी आणि किती वाजता यासंदर्भात दूरध्वनी आला किंवा अन्य मार्गाने धमकी देण्यात आली, याचीही माहिती आम्ही शिवसैनिक म्हणून घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.