मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, आरोग्य सेवेत मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेने निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळेत बदल करत 5 दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी (क्वारंटाइन) अशा कामाच्या वेळा लागू करण्यासाठीचे एक पत्रक काढले आहे. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. 2 दिवसांमध्ये लक्षणे कळत नाहीत. त्यामुळे हा निर्णय रद्द करत 8 दिवस काम आणि 6 दिवस सुट्टी (क्वारंटाइन) करावे, अशी मागणी केली आहे.
मुंबईत अंदाजे 2500 मार्ड डॉक्टर कार्यरत आहेत. सद्या हेच सर्व डॉक्टर कोरोनाच्या लढ्यात सेवा देत आहेत. पण मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असून डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून या डॉक्टर, नर्स यांना ही संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना विशिष्ट कालावधीसाठी सुट्टी देत क्वारंटाइन करणे गरजेचे असते. त्यामुळे आतापर्यंत निवासी डॉक्टरांना 7 दिवस काम आणि 7 दिवस सुट्टी देत क्वारंटाइन केले जात आहे. त्यात कुणाला लक्षणे दिसली तर मग त्यांची चाचणी करत त्यांच्यावर उपचार केले जात होते. पण, कोविड रुग्णालयावरील ताण अधिक वाढल्याने 7 दिवस डॉक्टरांना सुट्टी देणे शक्य नाही, असे म्हणत पालिकेने कामाच्या वेळेत बदल केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवत, आता 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टी (क्वारंटाइन) असा बदल करण्यात आल्याचे कळवले. मार्डने मात्र याला कडाडून विरोध केला आहे. कोरोनाची लक्षणे 2 दिवसात कळून येत नाहीत. अशावेळी एखाद्या डॉक्टरला लागण झाली असेल आणि तो कामावर आल्यास इतरांना ही संसर्ग होऊ शकतो. किमान 5 दिवस तरी लक्षणे कळण्यासाठी लागतात. त्यामुळे 8 दिवस काम आणि 6 दिवस सुट्टी असा बदल करावा. या मागणीचे पत्र आम्ही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांना पाठवल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी दिली आहे.
आमच्या मागणीवर संचालक आणि पालिका सकारात्मक आहे. त्यांच्याकडून 9 दिवस काम आणि 6 दिवस सुट्टी असा विचार सुरू आहे. पण अद्याप यावर अजून निर्णय झालेला नाही. तो लवकरच होईल अशी आम्हाला आशा आहे, असेही डॉ. वाघ यांनी सांगितलं.
हेही वाचा - CET ENTRANCE : वैद्यकीय प्रवेशाच्या सीईटीसाठी लवकरच संकेतस्थळ सुरू करणार - उदय सामंत
हेही वाचा - ..यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात लागणार ड्युटी..