मुंबई : शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट आज मुंबईसह देशभरात प्रदर्शित झाला आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मुंबईकरांनी पहिल्या दिवसाची तिकिटे अगोदरच बुक केली होती. त्यामुळे चित्रपटगृहांबाहेर शाहरुख प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एका बाजूला या चित्रपटाच ग्रँड रिलीज झालय. तर, दुसऱ्या बाजूला हा चित्रपट धार्मिक विरोधामुळे चर्चेत आहे. अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेकडून देखील या चित्रपटाला विरोध करण्यात आला आहे.
वाळवी, वेड चित्रपटांना फटका : काही दिवसांपूर्वीच अभिनेता स्वप्नील जोशी व सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेला वाळवी तर रितेश देशमुख व जेनेलिया यांची मुख्य भूमीका असलेला वेड यासह काही मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना चित्रपट प्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. मात्र, पठाण रिलीज झाल्याने अनेक चित्रपटगृहांनी मराठी चित्रपटांच्या स्क्रीन पठाणला दिल्या. याचा फटका मराठी चित्रपट व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेकडून थेटर मालकांना इशारा देण्यात आला आहे.
मनसेने केला निषेध : मागच्या एक महिन्यापासून रितेश देशमुखचा वेड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. संपूर्ण जगभरात वेड रिलीज होऊन चांगले कलेक्शन करत आहे. वाळवी सिनेमाने देखील दुसऱ्या आठवड्यात चांगली कमाई केली. त्यानंतर आज बांबू आणि पिकोलो सिनेमा रिलीज झालाय. यातल्या एकाही सिनेमाला चांगले मल्टिप्लेक्स, स्क्रिन्स किंवा थिएटर्स मिळत नाहीत. मी यो गोष्टीचा निषेध करतो. मल्टिप्लेक्स वाल्यांनी मराठी सिनेमांना चांगले थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स दिले नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. आम्ही बघून घेऊ की कसे मराठी सिनेमांचे थिएटर्स मिळत नाहीत, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
तर मनसे स्टाईल आंदोलन : यासंदर्भात मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पठाण चित्रपटामुळे मराठी चित्रपटांचे शो रद्द केल्यास त्याचे परिणाम चित्रपटगृह मालकांना भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. पठाण चित्रपटामुळे रद्द झालेले मराठी चित्रपटांचे शो तात्काळ पूर्ववत सुरू करावेत, अन्यथा मनसे स्टाईलने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे.
पठाणचा बोलबाला : पठाण सिनेमा मोठ्या धुमधडाक्यात संपूर्ण देशात रिलीज झाला. सिनेमानं पहिल्याच दिवशी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पठाण सिनेमा अँडवान्स बुकींग करतच पहिल्या दिवशी हाऊसफुल्ल झाला. हा सिनेमा देशात 5200 स्क्रिन्ससह रिलीज झाला. मुंबई पुण्यातील जवळपास सगळ्याच थिएटरला पठाणचे दिवसाला 4 व त्यापेक्षाही जास्त शो लावण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी सिनेमांना स्क्रीनच उपलब्द नसल्याचे पहायला मिळत आहे.
हेही वाचा : Pathaan Blockbuster : दीपिका पदुकोण शाहरुख खानसाठी लकी, जोडीचा सलग चौथा ब्लॉकबस्टर