मुंबई - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील मराठा समाजाचे काही नेते ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचे आरक्षण बेकायदेशीर असल्याचे वक्तव्य करत आहेत. स्वत: मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्याची मागणी करत आहेत. यामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल. मराठा समाजाने ओबीसींचे आरक्षण मागू नये, असा इशारा धनगर समाजाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात शेंडगे यांनी आज यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. मराठा समाजाकडून होत असलेल्या ओबीसीतील आरक्षणाच्या मागणीला त्यांनी कडाडून विरोध केला. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मात्र, त्यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचे आरक्षणाला बेकायदेशीर आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे राज्यात दोन्ही समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल, असे शेंडगे म्हणाले.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढावा. बारा बलुतेदारांसाठी वेगळे विकास महामंडळ स्थापन करावे. सरकारने आमच्या सर्व मागण्या ३० ऑक्टोबरपर्यंत मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही ओबीसी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न ही सरकारने सोडवावा. ओबीसीसोबत देशातील सर्व जातींची जातवार जनगणना केली जावी. ओबीसी आणि माराठ्यांमध्ये आरक्षणावरून संघर्ष होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी, अशी मागणी बंजारा समाजाचे नेते व माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली.
दरम्यान, सारथी या संस्थेला ज्याप्रमाणे निधी दिला जातो, तसा महाज्योतीला का दिला जात नाही, असा प्रश्नही शेंडगे यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.