मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर राज्यात मराठा समाजाकडून पुन्हा आंदोलने सुरू झाली आहेत. तर, दुसरीकडे ५२ टक्के असलेल्या ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात असून यामुळे दोन्ही समाजातील तेढ वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुळाशी प्रतिक्रांतीची लक्षणे असल्याचा गंभीर दावा केला आहे. त,र संभाजी ब्रिगेड आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यातील ज्येष्ठ नेते संतोष शिंदे यांनी मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळाल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेत एकत्र येऊन हा विषय सोडविण्याचे आवाहन केले आहे.
प्रा. श्रावण देवरे म्हणतात की, राजकीय अस्थिरतेतून सामाजिक अस्थिरता आणि सामाजिक अस्थिरतेमधून प्रतिक्रांती आणि या प्रतिक्रांतीमधून जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था आणि शोषणव्यवस्था पक्की करणे, हा त्यामागचा हेतू आहे. हाच उद्देश सफल करण्यासाठी अगदी लहान-लहान कारणासाठी झुंडशाही करणे, बेकायदेशीर आंदोलने करणे, बेकायदेशीर मागण्या करणे आणि सरकारला अडचणीत आणणे हे प्रकार मूठभर लोकांकडून सुरू आहेत. माध्यमांना हाताशी धरून असे एक चित्र निर्माण केले जात आहे की, संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. परंतु, यामागे वेगळी कारणे असल्याचा दावाही प्रा. देवरे यांनी केला.
राम मंदिराच्या प्रश्नाच्या वेळी हे अगदी मूठभर 4 टक्के लोक होते. याच लोकांनी झुंडशाही केली. 1990 नंतर ओबीसींना मंडल आयोग लागू झाला आणि याच दरम्यान ओबीसींना थोडे काही मिळायला लागले. त्याच काळात मंदिराच्या, धर्माच्या नावाने काही मूठभर लोकांनी झुंडशाही सुरू केली होती. अशीच झुंडशाही महाराष्ट्रात आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पुढे आली आहे. ही मूठभर झुंडशाही मूठभर लोकांचीच आहे. अनेक प्रकारच्या खोटे चिठ्ठ्या दाखवून आत्महत्या घडवून आणणे आणि इतके बलिदान झाले, तितके बलिदान झाले असे दाखवणे, असा सगळा प्रकार सुरू आहे. खरे तर, या सर्व आत्महत्यांची सीबीआय चौकशी झाल्यास तर, यामागे असलेले बहुतेक लोक जेलमध्ये जातील, असा गंभीर आरोप देवरे यांनी केला. तसेच, हे गुंडगिरी करणारे लोक, हे सर्व संघ, भाजपाचे हस्तक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रात सध्या जे काही चाललेले आहे, त्याचे मुख्य लक्ष्य हे ओबीसी दाखवण्यासाठी आहे. मात्र, त्याआडून या देशात आणि राज्यात जातीव्यवस्था मजबूत करणे हे त्यांचे खरे लक्ष्य असून यासाठी राज्यातील जे पुरोगामी विचार प्रवाह आहेत, या सर्व प्रवाहांनी ही गंभीर गोष्ट लक्षात घेतले पाहिजे, असेही प्रा. देवरे म्हणाले. यासाठीच शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या विरोधात विधेयके मंजूर होत आहेत. या सर्वांची गोळाबेरीज करून पाहिली तर सर्व फुले, शाहू, आंबेडकरवादी आणि पुरोगामी विचारांच्या शक्तीने एकत्र यावे, असे आपल्याला वाटत असल्याचे देवरे म्हणाले.
हेही वाचा - व्हीलचेयरवर बॅडमिंटन खेळाडूने रचला इतिहास; शशांकने जिंकली 10 पदके
मराठा आरक्षणाचे समर्थक व संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षण हा सध्या पेचात पडलेला प्रश्न आहे. अभिमान वाटावे असे लाखोंचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले. गरीब मराठ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सरकार नेहमी बदलत असतात, परंतु निर्णय घेताना मात्र मराठ्यांना वाऱ्यावर सोडले जाते, त्यामुळे गरीब मराठ्यांचा वाली कोणी नसल्याचे शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल आणि घटनात्मक आरक्षण द्यायचं असेल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्याशिवाय हे आरक्षण मिळू शकत नाही. कारण राज्यघटनेमध्ये एससी - एसटी - ओबीसी याच्यापेक्षा दुसरी कॅटेगिरी नाही. अथवा दुसरीकडे, यासाठी घटनात्मक आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. महाराष्ट्रातील सगळे खासदार एकत्र झाले, त्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणला आणि विशेष अधिवेशन बोलावले तर त्यातून घटनात्मक आरक्षणाची मर्यादाही वाढवली जाऊ शकते आणि त्यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते.
आरक्षणासाठी ५२ तरुणांनी आत्महत्या केली, परंतु यासाठी केंद्र सरकारला काही वाटत नाही. सर्व पक्षाचे सगळे नेते मराठा एक राजकीय मुद्दा बनवून याकडे गांभीर्याने पाहत नसतील ही एक दुर्दैवाची बाब आहे आणि याच्यासाठी घटनात्मक चौकटीमध्ये आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. राज्यातील खासदारांची नैतिक जबाबदारी आहे त्यांनी संसदेमध्ये हा सर्व विषय घेऊन मांडला पाहिजे. परंतु त्यांची इच्छा नाही. साधे नगरसेवकसुद्धा निवडून येताना समाजाचे आहेत म्हणून येतात, परंतु त्यानंतर सर्व समाजाला विसरतात, हेच समाजाचे दुर्दैव असल्याचे शिंदे म्हणाले.
हेही वाचा - मराठा राजघराण्याचा गौरव; विजयाराजे सिंधियांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे नाणे जारी