पुणे - मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 8 डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज ( रविवार ) झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांविषयी पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय बैठकीत विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी या बैठकीत मराठा आरक्षण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 8 डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिवेशन रद्द झाल्यास पायी 'लॉंगमार्च'
मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 8 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून नागरिक येणार आहेत. ज्याला जे शक्य होईल त्यानुसार तो मुंबईत येणार आहे आणि मुंबईत आल्यानंतर हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले तर मग राज्यभरातून सर्व एकत्र येऊन पायी लॉंग मार्च काढण्यात येईल, असा निर्णयही या बैठकीत करण्यात आला आहे.
1 आणि 2 तारखेला राज्यभर महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शने
एसईबीसीची यादी जाहीर झालेली असतानाही ऊर्जामंत्री नितीन राऊत हे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नियुक्त्या देत नाहीत. 1 आणि 2 तारखेला इतर विद्यार्थ्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे, यातही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणून राज्यभर मराठा समाजाच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक 1 आणि 2 तारखेला राज्यभर महावितरणाच्या कार्यालयालाबाहेर तीव्र निदर्शने करतील, अशी भूमिकाही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने घेण्यात आली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी न्यायालयाचा निर्णय आलेला नसतानाही 11 वीच्या प्रवेश प्रकियेबाबत घाई घडबडीत निर्णय घेतल्याने हजारो मराठा मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मराठा समाजाची दुसरी यादी येणार होती, मात्र ती थांबण्यात आली. फक्त आणि फक्त मराठा दोषी असल्याने वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप करत शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली.
काही नेते मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करतात
आम्हाला आमचे आहे ते मिळाले पाहिजे, दुसऱ्याचे काहीच नको, अशी भूमिका मराठा समाजाची असतानाही या सरकारमधील काही ओबीसी नेते मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांची कानउघाडणी करावी, अन्यथा पुढे जे होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
शरद पवारांनी विशेष लक्ष द्यावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे राज्याचे प्रमुख नेते आहे. मराठा आरक्षणाच्या विषयी शरद पवार यांनी विशेष लक्ष द्यावे. त्याचबरोबर सरकारमधील सर्व नेत्यांनी मराठा आरक्षणमध्ये विशेष लक्ष देऊन 'आउट ऑफ बोर्ड' येऊन हा विषय कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.