मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते. जवळपास दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल रेल्वे ओळखली जाते. दर दिवशी लोकल रेल्वेच्या पश्चिम, मध्य, हार्बर व ट्रान्स हार्बर सारख्या मार्गांवर धावणाऱ्या लोकल रेल्वेतून जवळपास एक कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, ही मुंबईकरांची लाईफलाईन आता 'डेथलाईन'सुद्धा बनत असल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.
फलाटांची कमी उंची, कोसळणारे पादचारी पूल, रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात, भरधाव रेल्वेतून दरवाज्याजवळ प्रवास करत असताना खांब लागून झालेले अपघात किंवा लोकलच्या टपावर बसून झालेले अपघात, अशा विविध कारणांमुळे लोकल रेल्वेच्या मार्गांवर 2013 पासून ते 2018 पर्यंत तब्बल 19 हजार 431 जणांचा मृत्यू झाला आहे. यात आतापर्यंत 20 हजार 23 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
- 2013 मध्ये एकूण 3 हजार 506 लोकांचा मृत्यू झाला होता तर, 3 हजार 318 जण रेल्वे अपघातात जखमी झाले होते.
- 2014 मध्ये एकूण 3 हजार 423 लोकांचा मृत्यू झाला होता तर, 3 हजार 299 जखमी झाले होते.
- 2015 मध्ये एकूण 3 हजार 304 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला तर, 3 हजार 349 रेल्वे अपघातामध्ये जखमी झाले आहेत.
- 2016 मध्ये एकूण 3 हजार 202 लोकांचा मृत्यू झाला असून 3 हजार 363 जण जखमी झाले आहेत.
- 2017 मध्ये 3 हजार 14 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून 3 हजार 345 जण जखमी झाले आहेत.
- 2018 मध्ये एकूण 2 हजार 981 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे तर, 2 हजार 173 जण जखमी झाले आहेत.