मुंबई - अंतिम वर्षीय परीक्षांचा तिढा सुटत नसल्याने विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचे अस्त्र उगारण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकार व यूजीसीविरोधात विद्यार्थी भारती या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कल्याण येथील संघटनेच्या कार्यालयात बेमुदत उपोषण सुरू केले होते. राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांंना माहिती मिळताच त्यांनी उपोषणस्थळी धाव घेत मंजिरीची भेट घेतली.
तनपुरे यांनी उपोषणस्थळावरून खासदार सुप्रिया सुळे यांना फोन लावत विद्यार्थ्यांनाशी बोलणं करून दिले. परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी खासदार म्हणून मी पूर्ण प्रयत्न करेन. आपण उपोषण सोडावे, अशी विनंती खा. सुळे यांनी मंजिरीला केली. त्यांचा मान राखत मंजिरीने उपोषण सोडले आहे.
विद्यार्थी भारती संघटनेने १० दिवसांची मुदत सरकारला दिली आहे. १० दिवसांच्या आत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला नाही, तर पुन्हा उपोषण केले जाईल, असे विद्यार्थी भारतीने जाहीर केले आहे.