मुंबई - कोरोना विषाणूच्या रुग्णाची झपाट्याने वाढ होत असताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, तोंडाला मास्क लावावे असे पालिका वारंवार सांगत आहे. चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावर रविवारी एकाने भाजी खरेदी करताना एका व्यक्तीला तोंडाला मास्क लावा असे सांगणे त्याच्या जीवावर बेतले. मास्कची माहिती सांगणाऱ्या त्या व्यक्तीच्या घरावर जमावाने रात्री तलवार चाकूने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केले आहे.
माहितीनुसार, टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीएल लोखंडे मार्गावर रविवारी सकाळी काही लोक विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता भाजी खरेदी करत होते. यावेळी नवनीत राणा नावाच्या व्यक्तीने नियम पाळा असे सांगताच काही लोकांसोबत वाद झाला आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्याचा सूड उगवायला आरोपी हा रात्री रात्री ८ च्या सुमारास काही जणांना सोबत घेऊन राणा यांच्या घरी पोहोचला. मात्र, त्यावेळी राणा तेथे नसल्याने आरोपी आणि त्याच्यासह आलेल्यांनी राणा यांचा भाऊ फिर्यादी किर्तीसिंग सुरेंद्र सिंग राणा (वय 34) व इंदरसिंग राणा (वय 35) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात इंदरसिंग राणा याच्यावर तलवारीने वार व पाठीत चाकू भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणई टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.
तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वारंवार करण्यात येणाऱ्या आवाहनाकडे काहीजण याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. तर, याबद्दलची आठवण करून देणंही एकाच्या जीवावर बेतलं आहे.