मुंबई Mamata Banerjee News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान याठिकाणी 1 डिसेंबर 2021 रोजी उपस्थित होत्या. त्यावेळेला सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीत म्हणताना त्यांनी अनादर केल्याची तक्रार मुंबई भाजपा सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केली होती. या प्रकरणातील सुनावणीत न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज निर्णय देत आदेश जारी केलाय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा कोणताही अनादर केलेला नाही. त्यामुळं आमदारांची याचिका फेटाळून लावत असल्याचे आदेश आज (31 ऑक्टोबरला) न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेत. तसंच तक्रारदार प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात उपस्थित नसल्याचं न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलंय.
शिवडी न्यायालयानं दिले होते चौकशीचे आदेश : ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला असा आरोप करत विवेकानंद गुप्ता या मुंबई भाजपा कार्यकर्त्यानं ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. न्यायालयाच्या समन्सला ममता बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होतं. उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाची कार्यवाही उचित ठरवली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर शिवडी सत्र न्यायालयानं 18 एप्रिल 2023 रोजी ममता बॅनर्जी यांच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.
पोलिसांच्या तपासातून ममता बॅनर्जी निर्दोष : शिवडी न्यायालयाच्या आदेशानंतर या संदर्भातला संपूर्ण तपास मुंबई पोलिसांनी पूर्ण केलाय. पोलिसांनी न्यायालयाकडं या प्रकरणातील तपासाचा अहवाल सुपूर्द केला होता. न्यायालयानं उपलब्ध पुराव्याच्या आधारे मुंबई भाजपा सचिव विवेकानंद गुप्ता यांची याचिका फेटाळून लावत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा कोणताही अनादर केला नसल्याचं आपल्या निर्णयात नमूद केलंय. यामुळं ममता बॅनर्जी यांना दिलासा मिळालाय.
हेही वाचा :