मुंबई - नाशिकच्या मालेगावमध्ये 2008 ला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित आरोपी आहेत. त्यांना अटक करून नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले होते. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप काढून टाकण्यासाठी कर्नल पुरोहितने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, पुरोहितच्या या घटनेतील एका पीडित व्यक्तीने याचिकेला आव्हान दिल्याने आरोपीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
बॉम्ब स्फोटातील मृताच्या वडिलांनी घेतला आक्षेप -
कर्नल पुरोहितवर युएपीए कायद्यांच्या अंतर्गत दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे. कुठलीही रितसर परवानगी न घेता त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा कर्नल पुरोहितने याचिकेत केला होता. मात्र, कर्नल प्रसाद पुरोहितच्या या याचिकेला मालेगाव बॉम्बस्फोटातील मृत व्यक्तीच्या वडिलांनी विरोध दर्शवला आहे. निसार अहमद हाजी सय्यद बिलाल या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुरोहितच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस एस शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निसार अहमद हाजी सय्यद बिलाल यांना याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण -
29 सप्टेंबर 2008 ला मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेत चारजणांचा मृत्यू झाला तर, 79 जण जखमी झाले होते. या प्रकरणी ८ जणांना यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, राकेश धावडे, सुधाकर द्विवेदी, दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी, प्रवीण टकलीकी या आरोपींना अटक करण्यात आलेली होती. याप्रकरणी आतापर्यंत शिवनारायण कलसंग्रह, शाम साहू, अजय राहिरकर जगदीश म्हात्रे, साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन मिळालेला आहे.