मुंबई - न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या तब्बल ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना लवकरच नियुक्ती देणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी मंत्रालयात सांगितले.
परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदाच्या भरतीसाठी सेवा प्रवेश नियमात काही बदल केले होते. त्या बदलानुसार २०१७ साली या पदाची जाहिरात काढून भरती प्रक्रिया करण्यात आली होती. पण काही जणांनी सेवा प्रवेशातील बदलास तसेच त्यानुसार झालेल्या भरती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश देताना परिवहन विभागाने सेवा प्रवेश नियमात केलेले बदल योग्य असल्याचे सांगितले. त्यानुसार भरती प्रक्रियाही योग्य असल्याचा निकाल दिला.
सुमारे २ वर्षापासून रखडलेली ८३२ इतक्या सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री रावते यांनी या सर्व उमेदवारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना परिवहन मंत्री रावते म्हणाले की, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने नेहमीच भरतीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच सहायक मोटार वाहन निरीक्षक भरतीतील किचकट नियम रद्द करुन ही प्रकिया सुटसुटीत करण्यात आली होती. आता नियुक्त झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्रे देण्यात येतील.