मुंबई- ग्राहकांना रांगेत उभे राहून महावितरणचे बिल भरण्याचे दिवस आता संपणार आहेत. महावितरण खेडोपाडी तसेच गावोगावी डिजिटल पेमेंट वॉलेटची सुविधा ग्राहकांना देणार आहे. त्यामुळे गावच्या ठिकाणी अगदी पानाच्या टपरीपासून ते किराणा दुकानातही ग्राहकांना वीजेचे बिल भरता येणार आहे.
महावितरणने पेमेंट वॉलेटसाठी काही शहरांमध्ये चाचपणी केली होती. त्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने येत्या काही दिवसांमध्ये महावितरण पेमेंट वॉलेट सुविधेची सुरूवात करणार आहे. या मोबाईल वॉलेटमध्ये किमान ५ हजार रूपयांपासून ते कमाल १ लाख रूपयांपर्यंत पैसे भरण्याची सुविधा असणार आहे.
महावितरणने संपूर्ण राज्यात डिजिटल वॉलेटचा पर्याय देण्याचे नियोजन केले आहे. त्यानूसार कोणालाही डिजिटल वॉलेटसाठी फ्रँचायझी घेता येणार आहे. महावितरणच्या डिजिटल वॉलेटमध्ये पैसे रिफिल करून पान टपर्यांवर तसेच किराणा मालाच्या दुकानात ग्राहकांकडून बिलभरणा करून घेता येईल. ग्राहकांना बिल भरण्यासाठीची पावती देण्याची सुविधाही याठिकाणी असेल. ग्राहकांनी आपले वीजबिल तसेच मोबाईलचा एसएमएस दाखविल्यावरच वीजबिलभरणा करण्यात येईल. या पेमेंट वॉलेटची सुविधा देणार्याला प्रत्येक बिलामागे महावितरण ३ ते ४ रूपयांचा इन्सेटीव्ह देणार आहे.
महावितरणचे अॅप किंवा वेबसाईट वापरूनही ग्राहकांना बिलभरणा करण्याची सुविधा देता येणार आहे. पण ग्राहकांना त्यासाठी पावती देणे बंधनकारक असणार आहे. ग्राहकांना वीजबिल भरल्यानंतर तत्काळ एसएमएस आल्याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणच्या अडीच कोटी वीज ग्राहकांपैकी आतापर्यंत ५० लाख ग्राहक हे मोबाईल अॅप आणि ऑनलाईन बिल पेमेंटची सुविधा वापरून वीजबिल भरतात. तर उर्वरीत ग्राहक अजुनही ऑफलाईन पद्धतीने वीजबिल भरतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या ग्राहक वर्गाला डिजिटल पेमेंट वॉलेटमधून सुविधा देणे शक्य असल्याचे मत महावितरणच्या अधिकार्याने व्यक्त केले आहे. ग्राहकांना वीजबिल भरणा केंद्रापर्यंत पोहचून वीजबिल भरण्याएवजी नजीकच्या ठिकाणीच हा पर्याय उपलब्ध होणार आहे.