मुंबई/पुणे - मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका (Corporation Election) आहेत. यात पुणे महानगरपालिकेचा (PMC Election) देखील समावेश आहे. याच संदर्भात आता शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पुण्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फिक्स असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्राथमिक चर्चा झाली-
सचिन अहिर म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी निश्चित होणार आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर युती करण्याची आग्रही भूमिका घेतली. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीला राष्ट्रवादीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासंदर्भात निर्णय घेतील.
फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही-
पुढे बोलताना अहिर म्हणाले की, प्राथमिक चर्चा जरी सकारात्मक झाली असली तरी जागावाटपासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यासंदर्भात प्रमुख नेत्यांची आणखी एक बैठक होईल व त्यात याचा निर्णय घेतला जाईल. तो दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते जाहीर करतील.
दरम्यान, पुण्यासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या धर्तीवर युती झाल्यास यावर आता भाजपचा ॲक्शन प्लॅन काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.