मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले असल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच हे नवीन सरकार भारतीय संविधानाच्या तत्व आणि मूल्यांवर चालणार आहे. तसेच आमच्या सरकारमध्ये शेतकरी केंद्रस्थानी असेल. ही महाविकासआघाडी राज्याला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही शिंदे म्हणाले.
थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमची एक मजबूत आघाडी तयार झाली आहे. जनतेच्या हितासाठी काम करणारी, मूल्य, तत्व केंद्रस्थानी ठेऊन आम्ही काम करणार आहोत. राज्याला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे शिंदे म्हणाले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सविस्तर चर्चेनंतर किमान समान कार्यक्रम ठरला आहे. हे नवे सरकार सामान्य माणसाला आपले वाटले पाहिजे. समाजातील सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारे हे सरकार असल्याचे शिंदे म्हणाले.
या महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आज राज्यात स्थापन होणार असून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या सगळ्या गोष्टी घडत असताना, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो. ते किमान समान , कार्यक्रमाच्या माध्यमातून ही आघाडी भारतीय संविधानाची मुल्ये जपणारी असेल. या विकास आघाडीत सर्व जाती धर्म, वर्गातील लोकांना सोबत घेऊन जाणारी असेल, समाजातील सर्व विकास घटकांना सोबत घेऊन जाणारी ही विकास आघाडी काम करेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील हे सरकार शेतकरी आणि सामान्य माणसांच्या हिताची जपणूक करणारे असेल. त्यांच्या विकासासाठी हे सरकार काम करेल.